दोडामार्ग
तालुक्यातील अनेक गावात ग्रामदैवतांच्या जत्रा सुरू होत आहे या निमित्त अनेक ग्रामपंचायतीनी बाहेरून येणाऱ्या व्यावसायिक तसेच भाविक यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात गावबंदी केली आहे, मात्र सध्या देशात सुरू होत असलेली अनलॉक ची प्रक्रिया तसेच शासनाने केलेली नियमांची शिथिलता याची नोंद घेऊन येणाऱ्या जत्रोत्सवात दोडामार्ग तालुक्यातील सरपंचांनी बाहेर गावाहून येणाऱ्या व्यवसायिकांना जत्रेच्या दिवशी गावात व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा कसई दोडामार्ग नगरपंचायतीची उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केली आहे.
सध्या कोरोनाचा फैलाव कमी होत आहे यात शासन अनेक नियम शिथिल करत आहे अशावेळी ग्रामपंचायत पातळीवरती जत्रेत अनेक प्रकारचे व्यवसाय हे व्यावसायिक या ठिकाणी करत असतात यात मुख्यत्वे खेळणी, फुले, खाजे अशा अनेक व्यवसाय येतात यावरती या लोकांचा चरितार्थ सुरू असतो मात्र सध्या अनेक ग्रामपंचायतीने अशा व्यावसायिकांना गावात प्रवेश नाकारला आहे, त्यामुळे या लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे.
तालुक्याचा एकूण विचार करता बाजारहाट करण्यासाठी गावातील लोक हे नियमितपणे दोडामार्ग भेडशी किंवा अन्यत्र बाजारपेठेत फिरत असतात मात्र याच बाजारपेठेतील व्यावसायिकांना गावात प्रवेश नाकारणे हे किती योग्य आहे?, याचाही विचार होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच या गावातील अनेक नागरिक हे इतरत्र कामधंद्यानिमित्त फिरत असतात.
या सर्व गोष्टींचा विचार करून व गावातील लोकांचे आरोग्य व इतर सर्व सुविधा याचा विचार करता या व्यावसायिकांना योग्य ती समज देऊन व शासनाचे नियम पाळून गावात व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी असेही चव्हाण म्हणाले.