नियम डावलून सुरू असलेले गॅस पाईप लाईन खोदाईचे काम बंद करा…
माजी नगरसेवकांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी
सावंतवाडी
शहरात सुरू करण्यात आलेल्या गॅस पाईपलाईनचे काम हे दिलेल्या नियमानुसार केलं जात नाही. त्या ठिकाणी नगरपालिकेचा एकही सुपरवायझर हजर नसतो. त्यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्वरित काम थांबवण्यात यावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी नगरसेवक परिमल नाईक, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी नगरसेवक नासिर शेख यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
दरम्यान खोदलेल्या ठिकाणी रस्त्यावर धूळ, माती पसरली असून त्या ठिकाणी एकही पाण्याचा टँकर उपलब्ध नाही. त्यामुळे जनतेला वेटीस धरून स्वतःच्या स्वार्थासाठी जर हे काम करत असतील तर ते त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. शहरातील विविध समस्या संदर्भात माजी नगरसेवकांनी आज मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शहरात आज गॅस पाईपलाईनचे काम हे मोठ्या प्रमाणात सुरू असून यावेळी अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक दुकानांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून याचा नाहक फटका तेथील जनतेला बसत आहे. त्यामुळे काही नागरिकांनी देखील आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तर काही लोक आमच्यावर संशय घेत असून कुठेतरी माजी नगरसेवकांचा देखील यात हात आहे का ? असा संशय देखील काही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नियम डावलून व जनतेला त्रास होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी केली. दरम्यान काही ठिकाणी या रस्त्याचे कामांमुळे नळाच्या पाईपलाईन देखील फुठल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी देखील येत नाहीत. त्या लोकांनी करायचं तरी काय ? असा सवाल देखील यावेळी माजी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना उपस्थित केला. दरम्यान आपण त्वरित ज्या काय समस्या असतील त्यावर तात्काळ कारवाई करून निश्चितच सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देखील मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी यावेळी माजी नगरसेवकांना दिले.