करूळ गावातील संतापजनक घटना
वैभववाडी :
तुटलेल्या वीजवाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशीही करूळ गावातील वीजपुरवठा खंडित आहे. सलग दोन दिवस गाव अंधारात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचारी साईडवर काम करत असले तरी अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
करूळ जामदारवाडी येथे मुख्य मार्गावरील वीज वाहिन्या कंटेनरच्या धक्क्याने शुक्रवारी सकाळी तुटल्या. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कंटेनरचा करूळ बँक नजीकच्या वीज वाहिन्यांना जोरदार धक्का बसला. या धक्क्यात वीजवाहिन्या तुटून खाली रस्त्यावर पडल्या. शिवाय तीन वीज खांब पूर्णता वाकले आहेत.
शनिवारी सकाळपासून काही कर्मचारी घटनास्थळी काम करत आहेत. परंतु जबाबदार अधिकारी त्या ठिकाणी नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होण्यास विलंब लागत आहे.