आंगणेवाडीतील भराडी मातेचा २ मार्च रोजी वार्षिकोत्सव…
मालवण
नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिकोत्सव २ मार्च २०२४ रोजी होणार आहे. देवीला कौल लावल्यानंतर आज सकाळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने यात्रेची तारीख जाहीर केली.
नवसाला पावणारी आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची तारीख निश्चीतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. डिसेंबर महिना आला की मुंबईस्थित चाकरमानी, मित्रमंडळी आपआपल्या नातेवाईकांना सतत संपर्क ठेवून असतात. तारीख निश्चित झाली की यात्रेत येण्यासाठी तिकीट बुकिंगसाठी गर्दी, सुट्टीकरिता धडपड करत असतात. काही दिवसांपूर्वी पारध करण्यात आली होती. त्यानंतर धार्मिक विधी केल्यानंतर आज सकाळी मंडळाच्या वतीने आंगणेवाडी यात्रा २ मार्चला होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.