अशी ही दुर्दम्य इच्छाशक्ती…
आयुष्याच्या वाटेवर खूप लोक भेटले. सर्वांकडून बरंच काही शिकायला मिळाले. अशाच एका वळणावर चिरंजीवाच्या लग्नामुळे एका ऊर्जादायी कुटुंबाबरोबर नातं जुळलं. हे कुटुंब म्हणजे माझ्या सुनेचं माहेर. माझे व्याही माननीय श्री. रामनाथ व संजय चोडणकर. दोघेही व्यवसायाने सराफ. मोठे रामनाथदादा यांना सायकलिंगचा छंद. व्यवसायाने सराफ असलेलने दिवसभर पेढी सांभाळत एका जागेवरच बसून व्यवसाय करावा लागतो . शिवाय येणाऱ्या गिऱ्हाईकांसोबत सततचा वार्तालाप.सकाळी आठ ते रात्री नऊ या दहा बारा तासांच्या श्रमामुळे सामान्य माणूस दमून भागून जातो. पण रामदादा सदैव प्रसन्न आणि हसतमुख दिसतात. त्याचं कारण दादांचे रोजचे सायकल चालवणे. रात्री झोपायला कितीही उशीर होऊ दे पण सकाळी पाचला उठून सायकलिंगला जाणं हा त्यांचा शिरस्ता मात्र तिन्ही ऋतूमध्ये सुरूच असतो.
आपण कित्येकदा स्वतःला कमी लेखतो आणि आपल्या स्वप्नांना सीमारेषेत बांधतो. माझे शरीर साथ देणार नाही. मला हे जमणार नाही. अशी रडगाणी गात राहतो. स्वतःहून कोश बनवून आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून जगाला गवसणी घालण्याची संधी मात्र गमावतो.
गेल्या दीड वर्षांपूर्वी रामनाथदादा सायकलिंग करताना हायवेवर अचानक पडले आणि उजव्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झालं. जवळ जवळ दहा दिवस दादा दवाखान्यात ॲडमिट होते. सर्वांना वाटले आता दादांच्या सायकलिंगला पुर्णविराम मिळतो की काय..? त्या होणा-या भयंकर वेदनेतही त्यांनी डॉक्टरांना सांगितले, “मला टु व्हिलर,फोर व्हीलर नाही चालवता आली तरी चालेल…पण डॉक्टर .मला सायकल चालवण्याइतपत बरं करा. अन्यथा मी जीवंत असून मेल्यासारखा होईन.” डॉक्टरांचे प्रयत्न व दादांची जबरदस्त इच्छाशक्ती यामुळे दादा पूर्णतः बरे झाले. नुसते बरे झाले नाही तर तीन महिन्यांतच त्यांनी भाचा अतुल सोबत मनाली ते लेह हा 500 किलोमीटरचा सायकल प्रवास आखला. खांद्याच्या हाडाला जोडण्यासाठी जो स्क्रू बसवला होता तो अजून काढला नसलेने घरातले सारे काळजीत होते. अति सायकलिंग केलेने वाटेत त्रास होईल असे सर्वांना वाटते होते. पण दादांनी कोणत्याही गोष्टीला न जुमानता हा ५०० कि.मी.प्रवास मोठा उत्साहाने पूर्ण केला आणि परत आल्यावर खांद्यातील स्क्रू बाहेर काढला. म्हणतात ना “ध्येयवेड्या माणसांसाठी यशोशिखर गाठणे कठीण नसते.” दुखलेपणाचे , आजारपणाचे लाड न करणारा दादांचा हा छंद त्यांना दर वेळेस वेगवेगळी आव्हाने स्वीकारण्यास भाग पाडतो. ५००कि.मी.,१००० कि.मी.,१५०० कि.मी. अशी आव्हानांची मालिका सुरूच होती.
गेल्या दोन महिन्यापूर्वी तर या सायकलने त्यांना खूप मोठे आव्हान स्वीकारायला भाग पाडलं आणि ते आव्हान म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी जवळ जवळ ४०००कि.मी. चा हा प्रवास. घरच्यांना जेव्हा आपला हा मानस दादांनी बोलून दाखवला तेव्हा सारेजण विरोध करू लागले . पण लक्ष्मणासारखा पाठचे भाऊ संजू मात्र त्यांच्या निर्णयाशी ठाम राहिले.” दादा, जा तू . इकडची काळजी करू नकोस. ग्रुप मधून गेलास तर हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करशील.एकट्याने ते शक्य नाही.” भावाच्या पाठबळाने दादांचा आणखी हुरुप वाढला आणि आव्हान पूर्ण करण्यास ते सज्ज झाले. सोबत त्यांचे सात सायकल प्रवाशी होतेच. गेल्या २२ नोव्हेंबरला भल्या पहाटे काश्मीरमधील लाल चौकातून काश्मीर ते कन्याकुमारी या सायकल प्रवासाचे पहिले पायंडल मारून आव्हानाचा श्रीगणेशा मोठ्या उत्साहाने केला. काश्मीर सारख्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत हा सायकल प्रवास मोठ्या जोमाने सुरू झाला. हे सात प्रवासी रोजचा १५० ते १७५ कि.मी.चा प्रवास करत . मजल दरमजल करत एकेक राज्य ओलांडत. प्रत्येक राज्याची ,शहराची वैशिष्ट्ये तेथील निसर्गसृष्टी पाहत हे सायकल प्रवासी आपले उद्दिष्ट पूर्ण करत होते. वाटेत भेटणारी अनेक मंडळी विचारपूस करून त्यांचे कौतुक करत. मदत करत. ट्रॅफिक पोलीस .आर्मीचे जवान त्यांना प्रेरणा देत. उगवणाऱ्या सूर्याला सोबत घेऊनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात होई. रात्री जोपर्यंत पाय थकत नाहीत तोपर्यंत त्यांचा उत्साह कायम राही.
प्रवासात कुठेही पाणी पिणे , कुठेही आहार घेणं ,रात्री मिळेल त्या जागेवर झोपणं, पोटभर जेवण आणि ताजेतवाने होण्यासाठी सहा तासांची शांत झोप.. यापलीकडे कोणताही बडेजाव नाही. या २७ दिवसांच्या प्रवासात कसलेही औषध नाही. सायकलिंग हेच त्यांचं टॉनिक होतं. एकदा का सायकलवर स्वार झाले की आजूबाजूचा कोणत्याही प्रकारचा व्हायरस यांच्या वाटेला येत नसे .
पण जेव्हा ३८०० किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करून कन्याकुमारीच्या काठावर दादा पोहोचले …तेव्हा सर्वप्रथम त्यांनी या प्रवासात विना अडथळे ,विना तक्रार साथ सोबत करून उद्दिष्टाप्रत जिने पोहचवले त्या सायकलला त्यांनी शिरसाष्टांग दंडवत घातला. तिच्यापुढे ते नतमस्तक झाले आणि मग शांतपणे जमिनीवर पहुडून निरभ्र आकाशाकडे पाहत दीर्घ श्वास घेतला. स्वयंप्रेरणेतून आपल्या भारत मातेला सायकल प्रवासातून केलेले हे आगळेवेगळे वंदन खरंच संस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे. हा प्रवास पाहता
अनंत आमची ध्येयासक्ती
अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला..
या कवी कुसुमाग्रज यांच्या ओळी मला आठवल्या. रामनाथदादांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम.
– सौ.विद्या नलवडे, कोल्हापूर.