फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी तक्रार करावी- प्रा.एस.एन.पाटील
वैभववाडी
प्रत्येक व्यक्तीने कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. ग्राहकाचे अज्ञान आणि ग्राहक एकीचा अभाव यामुळे ग्राहकाची फसवणूक होतांना दिसते.
ग्राहकांनी सजग राहून व्यवहार केले पाहिजेत.
फसवणूक झाल्यास गप्प न बसता योग्य ठिकाणी तक्रार करुन न्याय मिळवला पाहिजे
असे प्रा. एस. एन.पाटील यांनी सांगितले.
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग शाखेच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त आयोजित केलेला “सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक, ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम आय.कुंभार, मराठी विभाग प्रमुख डॉ.एन. व्ही. गवळी, कॉमर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर.बी. पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रा.पाटील यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहक चळवळ, ग्राहक संरक्षण कायदा-१९८६ आणि नवीन ग्राहक संरक्षण कायदा-२०१९, ग्राहकाचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये व ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्राहक म्हणून आपली फसवणूक झाली असेल किंवा कोणी फसवणूक करीत असेल तर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची संपर्क साधावा असे आवाहनही प्रा.एस.एन.पाटील यांनी केले.
प्रत्येक व्यक्ती ग्राहक असून ग्राहक म्हणून आपण जागृत असले पाहिजे. तसेच आपण इतरांनाही जागृत केले पाहिजे. जागृत ग्राहक ही राष्ट्राची खरी संपत्ती असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.कुंभार यांनी केले तर आभार सदस्य प्रा.राहुल भोसले यांनी मांडले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी. पाटील यांनी केले.