You are currently viewing बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार

बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार

सिंधुदुर्ग :

 

गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल देणे बंधनकारक होणार आहे. गोवा राज्याच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना. नितीन गडकरी यांनी पणजी (गोवा) येथे दिले. तीन राज्यांचे प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये हे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. त्यामुळे आता गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी बांदा – पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका कार्यान्वित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

पणजी गोवा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोलनाका गोव्याच्या एन्ट्री पॉईंटवर बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला आहे. ना. नितीन गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, टोलनाके कधी बसविण्यात येणार तसेच कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार याची अद्याप निश्चिती झालेली नाही.

महाराष्ट्र – गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे आरटीओ विभागाचा टोलनाका सुमारे ३२ एकर जागा संपादन करून उभारण्यात आलेला आहे. गणेशोत्सवा पूर्वी हा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न आरटीओ विभागाचा होता. त्यासाठी जिल्ह्यातील आरटीओ अधिकाऱ्यांनी टोलनाक्याचा ताबा घेतला होता. मात्र, संबंधित ठेकेदार कंपनीची कामाची बीले अदा न झाल्याने त्यांनी हरकत घेतली होती. त्यामुळे उद्घाटन करण्याचा बेत फसला होता.

आता खुद्द ना. नितीन गडकरी यांनी टोलनाके सुरू करण्याचे निर्देश दिल्याने टोलनाका कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठेकेदार कंपनी आता काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले.

प्रतिक्रिया व्यक्त करा