देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी
सावंतवाडी तालुका देवस्थान समितीचे प. म. देवस्थान समितीला निवेदन
ओटवणे
सावंतवाडी तालुक्यातील स्थानिक सल्लागार देवस्थान उप समित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहताना अनेक अडचणी येतात. याबाबत सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सावंतवाडी कार्यालयातील अधिकारी बी डी ननावरे यांची भेट घेऊन या समस्या सोडविण्यासह अनेक मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. तसेच या समस्या सोडविण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कळवून त्वरीत कार्यवाहीची मागणी केली.
देवस्थानची नवीन उपसमिती स्थापन करताना येणाऱ्या अडचणी तसेच समितीचा कारभार पाहताना निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी या समस्यांसह मागण्याबाबत सविस्तर निवेदन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार हे निवेदन देण्यात आले. यावेळी अधिकारी बी डी ननावरे यांनी देवस्थान समित्यांच्या विविध समस्यांसह मागण्यां पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल एम सावंत, (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस ( वाफोली), सदस्य पंढरीनाथ पु राऊळ (सांगेली),, चंदन धुरी (कोलगाव), जीजी राऊळ (माडखोल), रघुनाथ नाईक (आरोंदा), मंगलदास देसाई (डेगवे), सल्लागार विलास सावंत (डिंगणे) आदी उपस्थित होते.