सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी मनसेकडून मानधन सुपूर्द…
मालवण
मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा, कार्यक्रम व देखभाली साठी शासनाकडून ६ हजार रुपयांचे तुटपुंजे मानधन दिले जाते. अनेक लोकप्रतिनिधीनी यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर मंदिराच्या पूजाऱ्यांसाठी २५ हजार रुपयाचे मानधन मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले असून दरवर्षी मनसेकडून शिवराजेश्वर मंदिरासाठी वाढत्या पटीत मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक आणि मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मनसेकडून शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा व उत्सवांसाठी पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे मानधन सुपूर्द करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत माहिती देण्यात आली. यावेळी गजानन राणे, मनसे नेते संदीप दळवी, संपर्क अध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर, सत्यवान दळवी, महेश परब, जिल्हाध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, चंदन मेस्त्री, मालवण तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे, संतोष मयेकर, मिलिंद सावंत, हेमंत जाधव, जिल्हा सचिव बाळा पावसकर, सचिन सावंत, गुरुदास गवंडे, पास्कोल रॉड्रिक्स, विशाल ओटवणेकर, कुणाल माळवदे, अभिजित मेथर, हर्षद परब, चिन्मय नाडकर्णी, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गजानन राणे म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकमेव मंदिर असून या मंदिरात नियमित पूजा तसेच वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम व उत्सव साजरे होत असतात. असे असताना शासनाकडून या मंदिराच्या पुजाऱ्यासाठी ६ हजार रुपयांचे मानधन देण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरासाठी इतकी कमी रक्कम मिळणे ही दुर्भाग्याची बाब आहे. आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधीनी देखील मंदिरातील उत्सवासाठी पूजाऱ्यांना निधी देण्याची आश्वासने दिली. मात्र ती कधीही पूर्ण झाली नाहीत. म्हणूनच मनसेने याबाबत पुढाकार घेत मंदिरासाठी पूजाऱ्यांना मानधन सुपूर्द केले आहे. हे मानधन दरवर्षी देण्यात येणार असून त्यातील रक्कमेत उत्तरोत्तर वाढ होत जाईल, असेही राणे म्हणाले. तसेच शासकीय मानधन वाढवून मिळण्यासाठी मनसेतर्फे शासनाकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे, असेही राणे म्हणाले.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग किल्ल्यात लाखो पर्यटक येत असतात. त्यांना किल्ल्याची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी किल्ल्यात संग्रहालय होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची स्मारके असणारे सिंधुदुर्ग किल्ल्यासारखे अनेक गडकिल्यांची आज अवस्था बिकट आहे. त्यामुळे शासनाने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखभाली साठी काही गोष्टी कराव्यात या मागणीसाठी पर्यटकांच्या सह्यांची मोहीम मनसेतर्फे राबविण्यात येणार आहे, असेही गजानन राणे यांनी सांगितले.