You are currently viewing टोनी डिजॉर्जच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेत केले पुनरागमन

टोनी डिजॉर्जच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेत केले पुनरागमन

*टोनी डिजॉर्जच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेत केले पुनरागमन*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेने शानदार पुनरागमन केले आहे. सेंट जॉर्ज पार्क, गकबेराह येथे झालेला दुसरा एकदिवसीय सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयासह त्यांनी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जोहान्सबर्गमधील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला होता. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २१ डिसेंबर रोजी पार्ल येथे खेळवला जाईल.

सेंट जॉर्ज पार्कवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा भारताचा हा पाचवा पराभव आहे. येथे भारताने यजमान संघाविरुद्ध केवळ २०१८ मध्ये केवळ एकच सामना जिंकला आहे. तर १९९२, १९९७, २००६, २०११ आणि २०२३ मध्ये भारत आफ्रिकेविरुद्ध येथे पराभूत झाला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. टीम इंडिया ४६.२ षटलांमध्ये २११ धावांवर गारद झाली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४२.३ षटकांत २ बाद २१५ धावा करून सामना जिंकला. त्यासाठी युवा सलामीवीर टोनी डी जोर्जीने एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक झळकावले.

२१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टोनी डि जोर्जी आणि रीझा हेंड्रिक्स यांनी शानदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. ८१ चेंडूत ५२ धावा करून हेंड्रिक्स अर्शदीप सिंगचा बळी ठरला. त्याच्यानंतर, रसी वान डर डुसेन आणि जोर्जी यांनी मिळून संघाला विजयाच्या जवळ नेले. डुसेन ५१ चेंडूत ३६ धावा करून बाद झाला. त्याला रिंकू सिंगने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. रिंकूने पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पहिली विकेट घेतली. जोर्जी १२२ चेंडूत ११९ धावा करून नाबाद राहिला आणि कर्णधार एडन मार्कराम दोन धावांवर नाबाद राहिला. जोर्जीने नऊ चौकार आणि सहा षटकार मारले.

भारताकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीतील हा दुसरा सामना असून दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत. कर्णधार केएल राहुलने ५६ धावांची खेळी केली. अर्शदीप सिंगने १८ धावा केल्या. रिंकू सिंगला पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात केवळ १७ धावा करता आल्या. संजू सॅमसन १० धावा करून बाद झाला तर तिलक वर्मा १० धावा करून बाद झाला. आवेश खान नऊ, अक्षर पटेल सात, ऋतुराज गायकवाड चार आणि कुलदीप यादव एक धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने नाबाद चार धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने तीन बळी घेतले. ब्यूरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांना प्रत्येकी दोन तर लिजाद विल्यमसन आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा