*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*बैलगाडी….*
बैलगाडी म्हटल्या बरोबर मला खुदकन् हसू फुटलं नि
मी तडक आमच्या मळ्यातच पोहोचले. कारण ही तसंच
आहे.या कृषीसंस्कृतीत जन्मलेली वाढलेली मी. बैलगाडी,
छकडं आणि मोठी रोज शेतात जाणारी बैलगाडी पहातच
लहानाची मोठी झाले. रोज संध्याकाळी शेतातून नेमाने
बैलगाडी बैल थेट दारासमोर आणून बैल थांबायचे.
मुकी जनावरं, सगळं कळतं हो त्यांना. कधी कधी तर सालदार
स्वत: गाडीत न बसता नुसती गाडी वाटे लावून द्यायचा.
ते धन्याशी एकनिष्ठ जीव धुरकरी नसतांना बरोबर दारात
येऊन उभे रहायचे. घराकडे तोंड करून बघायचे. मग माझी
आई अक्का, तिने सांभाळून ठेवलेला भाकर तुकडा कणीकोंडा
एकत्र करून ती तगारी त्यांच्यापुढे ठेवत असे.काही अपवाद
वगळता सगळेच पशुपक्षी धन्याशी एकनिष्ठ असतात.
जीवाला जीव देतात.
मी लहान असतांना मला शेतात यायचे म्हटल्या बरोबर
माझे वडिल सालदाराला गाडीत कडबा टाकून त्यावर
गादी अंथरायला लावायचे. मग गादीवर आरामात बसत
आम्ही शेतात जात असू .बैलगाडी लहानपणी इतकी आवडायची की, गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना गावाबाहेरच्या “हाय”(मोठी खोल विहिर)वरून पाणी भरायला
सालदार दोन मोठी टिपाडं गाडीत ठेवून ती भरायला “हाय”वर
जायचा तेव्हा आम्ही त्याच्या मागे लागत असू, “माले बी येनं से
पानी भराले”!म्हणत त्याच्या बरोबर जाण्याचा हट्ट करत असू.
सकाळी उठल्या पासून बैलगाडी नजरे समोर असे. सालदार
सकाळी आला की आधी बैलांना खुंट्यावरून सोडून पाणी
पाजायला नेणार.मग गायगोठा आवरून अंगण झाडून बैलगाडी जुंपणार.धुरकरी बसे पर्यंत बैल जागेवरून हलत नाही.सालदार बसताच बैल आपोआप पाय उचलून चालू
लागत.कधी काठी उगारायची गरज पडली नाही.
कृषी संस्कृतीचा मोठा आधार म्हणजे बैलगाडी व बैलजोडी.
आता जमाना बदलला आहे. पण पूर्वी हाच मोठा कणा होता.
घरोघर बैल गाड्या व बैलजोड्याच होत्या.आमच्या घरी दोन
बैलजोड्या व दोन सालदार असत. त्यांचे एकदम वर्षाचे वेतन
ठरत असे. मग त्यांच्या गरजे नुसार ते वेळोवेळी मागून घेत
असत. आमच्या बैलजोड्या नेहमीच सुंदर असत. डौलदार शिंगे असलेले व पांढरे शुभ्र बैल चढत्या किंमतीला मिळणारे
असे, माझे वडिल बैल खरेदी करत असत व त्यांची बडदास्त
ही उत्तम प्रकारे ठेवली जाई. त्यांच्या हिरव्या चाऱ्यासाठी विहिरी जवळचा शेताचा तुकडा राखीव असे. त्यात मग
वडिल सालदाराला घास गवत मका गाजर असे बैलांसाठी
खास पेरणी करायला लावत. शिवाय शेंगदाण्याची ढेप,
सरकी कडबा गव्हाचा ज्वारीचा असेच. कधी शेंगांच्या
पाल्याची गरी घातलेली असायची. म्हणजे बाराही महिने
जनावरांची आबाळ होणार नाही याची काळजी माझे वडिल
घ्यायचेच वरून गहू गाळून उरलेले गहू गिरणीतून जाडसर
दळून आणून संध्याकाळी बैल घरी आले की त्याचे गोळे,
म्हणजे भिजवलेल्या कणकेचे गोळे ही त्यांना खाऊ घातले
जात असत ह्याची मी साक्षिदार आहे.
खरीप व रब्बी दोन्ही हंगामात बैलगाड्यांना खूप काम असे.
कपाशी फुटली की ती वेचणाऱ्या बायकांना घेऊन कमरेला
कपड्याची खोळ बांधून बायका त्यात कपाशी टाकायच्या.
सालदार एक मोठ्ठं कपाशीच्याच काड्यांचं टोपलं(टोमं म्हणतात त्याला)घेऊन त्या बायकांजवळ जाऊन ती कपाशी
टोपल्यात गोळा करायचा. शेतात बैलगाडी सोडलेली असे.
बैल जवळच उभे किंवा बसलेले असत आराम करत.
मोठ्या मोकळ्या बैलगाडीत “भोत” (एक मोठ्ठं जाड सुतावे
विणलेले मजबूत असे) मोठ्ठे कापड अंथरलेले असे. सालदार
त्या टोपल्यातली कपाशी त्या गाडीत ओतत असे, त्या कापडावर. संध्याकाळ पर्यंत गाडी शिगोशिग भरली की,
मग सालदार ती भोत खालून वरच्या कापसावर झाकून
कपाशी बंद करून झाकून टाकत असे. मग आम्ही त्या उंच
कपाशीच्या भोतीवर बसून घरी येत असू. बायका पायी पायी
निघून जात असत कारण त्यांना घरी जायची घाई असे.घरी
जाऊन पुन्हा रात्रीचा स्वयंपाक करावा लागे. म्हणून त्या काट्या कुट्या सरपणासाठी वेचत घराकडे पळत असत.
बैलगाडी भोत भरून आली की लक्षुमी आली म्हणत असत.
सालदार गाडी सोडून बैल गाडीलाच बांधून ठेवायचा व मग
अजून एकदोन जणांच्या मदतीने घराच्या एका कोपऱ्यात
कपाशी रचली जायची व आम्ही लहान मुले व एखादा सालदारही वर चढून तिला खुंदत असू जेणे करून ती दाबली
जाऊन जास्त कपाशी त्यात बसावी.घरोघर हेच दृश्य
दिसत असे. कोणाकडे शेंगा कोणाकडे कपाशी कोणाकडे
तीळ असा माल भरला जायचा.
मग गाडी रिकामी झाल्यावर बैलांना चारापाणी केल्यावर
बैल वाडघ्यात बांधले जात व मग ते बसून आराम करत
रवंथ करत बसत असत.
ह्या बैलजोड्या अशी बडदास्त असल्यामुळे वर्षानुवर्षे टिकत
असत. त्यांना पायाला नाल ठोकण्याचाही कार्यक्रम चौठ्यात
होत असे. तो ही आम्ही लांबून बघत असू.
पोळ्याला तर बैलांचा थाट असे. सालदार त्या साठी लागणारे
गोंडे माळा शिंगांसाठी रंग वगैरे सामान वडिलांना धुळ्याहून
आणायला लावत असत.वडिलही हौसेने सारे आणून देत असत.मग त्या दिवशी सकाळी नदीवर बैलांची चोळून चोळून
आंघोळ होत असे. नि मग शिंगांना रंग लावण्याचा कार्यक्रम
होई. मध्येच अंगावर मोठे गोल ठिपकेही काढले जात.
संध्याकाळ पर्यंत सगळी तयारी झाली की झूल माळा गोंडे
लावून बैल सजत. काय सुंदर दिसायचे बैल.आणि मग गावातील प्रतिष्ठितांचे बैल पुढे व इतरांचे मागे अशी ढोल
ताशांच्या गजरात बैलांची मिरवणूक निघत असे. व अख्खा गाव कौतुकाने कडेने उभे रहात ती मिरवणुक बायका पोरांसह
पहात असे. माझे वडिल जिल्ह्याचे पुढारी व थोर स्वातंत्र्य
सैनिक असल्यामुळे त्यांच्या निगराणीत खूप वर्षे हे कार्यक्रम
रूबाबात होत असत. गांव तो सोहळा डोळाभरून पहात असे.
अशी ही गावातल्या मुख्य गल्यांमधून फिरून मिरवणुकीचे
विसर्जन होत असे व सालदारांसह बैल घरोघर परतत असत.
इकडे आईने दिवसभर पुरणाचा घाट (आमच्या कडे खापरावरचे मांडे असतात)घातलेला असायचा.मांडे,कटाची
मसाल्याची झणझणीत आमटी, भात, तांदळाची खीर, भजी
कुरडई वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे, चिकाचे पापड असा
जबरदस्त बेत असायचा.
मग दोन्ही सालदार येत. बैल दाराशी बांधून घरात येत.आई
बैलांसाठी चांगल्या मोठ्या पुरणपोळ्या व सुपात भरपूर बाजरी
घेऊन व निरांजन पेटवून हळद कुंकु लावून बैलांची मनोभावे पूजा
करून बैलांच्या पायांवर पाणी घालून त्यांना मनोभावे नमस्कार
करून शेती साठी मागणे मागत असे.आम्ही सारे आजूबाजूला
उभे राहून हा सोहळा बघत असू.आणि मग बसायची पंगत.
वडिलांबरोबर दोन्ही सालदार एक दोन निमंत्रित सतरंजीवर
मांडी घालून बसत.बाजूला अगरबत्या लावलेल्या असत. व
मोठ्या चवीने सावकाश आमटीचे भुरके मारत मंडळी आरामशीर जेवत पुरणाच्या जेवणाचा आस्वाद घेत असत.
तृप्त होऊन मंडळी मग ताटावरून उठत असत.त्या दिवशी
कुंभाराच्या घरी जाऊन मातीचे बैल आणून त्यांची ही पुजा
घरात होत असे व आज ही होते.
अशी बैलगाडी व बैलजोडी म्हणजे शेताचा मुख्य आधार म्हणजे कणा असे. ही बैलगाडी कितीतरी प्रकारच्या कामांना
वापरली जात असे. माझे लग्न झाले तेव्हा(१९६८)आमचे गाव
हायवे पासून तीन किलोमिटर आत असल्यामुळे आम्हाला घ्यायला फाट्यावर बैलगाडीच येत असे.जत्रा आली की निघाल्या बैलगाड्या, वधूवरांची मिरवणूक बैलगाडीतूनच,
देवदर्शनाला बैलगाडीतूनच ! लांबचे पाहुणे यायचे ते ही
बैलगाडीतूनच ! लग्नाचा मंडप आंब्याच्या डहाळ्या वाजत
गाजत घरी येणार त्या बैलगाडीतूनच ! बैलगाड्या दोन असत.
एक छकडी गाडी पडद्याची असे.बायका ह्या पडद्याच्या गाडीतून जात येत असत. मोठी गाडी शेती कामासाठी व बाहेर
गावी मोठ्या संखेने प्रवास करण्या साठी ही वापरली जायची.
बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळा असत.बैलगाडी चालतांना त्याचा
छान खळ् छन्नं असा होणारा आवाज मोठा मधुर वाटायचा.मुगले आझम सिनेमा लागला नि खेड्यापाड्यातून हजारोंच्या संखेने
बैलगाड्या भरून लोक धुळ्यात आले नि सिनेमा पाहून बैलगाडीने घरी परत गेले, आहे ना मज्जा! लेक माहेरी येणार
तर भाऊ बैलगाडी घेऊन तिच्या सासरी तिला घ्यायला जाणार!
मग ती त्या पडद्याच्या गाडीत बसून माहेरी येणार.जावई बायकोला घ्यायला येणार तो ही बैलगाडीतूनच! लग्नाच्या
करवल्या इकडून तिकडे वाजंत्री लावून जाणार त्या ही बैलगाडीतूनच!
आता नव्या जमान्यात सारेच चित्र बदललेले आहे हे खरे आहे
पण ती दृश्ये आमच्या डोळ्यांसमोरून आजही पुसली गेली
नाहीत हे ही खरे आहे.
सगळ्यात शोककारी प्रसंग म्हणजे बैलाच्या मृत्यूचा..! हो,
वर्षानुवर्षे सेवा देणारा तो बैल किंवा गाय मरणे म्हणजे
शोककळा पसरत असे.माझे वडिल मोठ्या इतमामाने पण
जड अंत:करणाने बैलाची पाठवणी करत असत. त्याच्या
अंगावर टाकण्यासाठी भले मोठे पांढरे शुभ्र कापड मागवले
जाई. मृत्यू म्हणजे काय? इतक्या लहानपणी कळत नसे.
पण गंभीर परिस्थिती कळत असे. आणि जी गाडी त्याने
आयुष्यभर ओढली त्यातच त्याचे शव ठेवून कापडाने झाकून
(आता ही मला ते दृश्य डोळ्यांसमोर दिसते आहे)त्याची दूर
डोंगर दऱ्यात पाठवणी केली जाई.
बैल सुस्थितीत असतांनाच त्या डौलदार जोडीचा फोटो काढून वडिल तो ओट्यावर उंचावर असा भिंतीला लावत असत.
त्या काळी असे बैलांचे असे फोटो घरोघर ओट्यावर लावलेले
दिसत असत कारण ते ही कुटुंबाचा एक भागच असत .कृषी
संस्कृतीशी जोडली गेलेली जनावरं शेतकऱ्याच्या घराचा
अविभाज्य भाग असतो. शेतकऱ्याचे आपल्या जनावरांवर
जीवापाड प्रेम असते.कारण तो त्यांना अन्नदाता मानतो.
असो, बैलगाडी विषयाने साऱ्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळून
खूप आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद.
प्रा.सौ.सुमती पवार UK
(९७६३६०५६४२)
दि: २४ ॲागष्ट २०२३
वेळ : ४/०२ दुपारी