You are currently viewing सूर्यकुमारचे टी-२० मधील चौथे शतक, रोहित-मॅक्सवेलशी बरोबरी; भारताचा दक्षिण आफ्रिकेवरील सर्वात मोठा विजय*

सूर्यकुमारचे टी-२० मधील चौथे शतक, रोहित-मॅक्सवेलशी बरोबरी; भारताचा दक्षिण आफ्रिकेवरील सर्वात मोठा विजय*

*सूर्यकुमारचे टी-२० मधील चौथे शतक, रोहित-मॅक्सवेलशी बरोबरी; भारताचा दक्षिण आफ्रिकेवरील सर्वात मोठा विजय*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सामनावीर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शतकानंतर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या शानदार फिरकीच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १०६ धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता तर दुसरा टी-२० सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी परदेशात भारताचा हा शेवटचा टी-२० सामना होता.

भारताने दक्षिण आफ्रिकेवर धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला. याआधी टीम इंडियाने त्यांचा गेल्या वर्षी राजकोटमध्ये ८२ धावांनी पराभव केला होता. याशिवाय २०१५-१६ पासून भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका गमावलेली नाही. भारताने शेवटची २०१५-१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून तीन सामन्यांची मालिका ०-२ ने गमावली होती.

सूर्यकुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलची बरोबरी केली. तिन्ही फलंदाजांची प्रत्येकी चार शतके आहेत. सूर्यकुमारने ५६ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांसह १०० धावा केल्या. भारताने २० षटकांत सात विकेट गमावून २०१ धावा केल्या. सूर्यकुमारशिवाय यशस्वी जैस्वालने (६०) तिसरे अर्धशतक झळकावले. यशस्वी आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० चेंडूत ११३ धावांची शतकी भागीदारी केली.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांत गडगडला. बर्थडे बॉय कुलदीपचे चेंडूच यजमान संघाच्या फलंदाजांना समजू शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने (३५) सर्वाधिक धावा केल्या. कुलदीपशिवाय जडेजानेही (२/२५) विकेट घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सातत्याने विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ ७५ धावांवर तंबूमध्ये परतला होता. एका बाजूने डेव्हिड मिलर धावा करत राहिला. मात्र, कुलदीपने खालच्या फळीतील फलंदाजांना टिकू दिले नाही. त्याने डोनोवेन (१२), महाराज (१), बर्गर (१), विल्यम्स (०) तर मिलरला (३५) धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव गुंडाळला. त्याने डावाच्या १४व्या षटकात तीन बळी घेतले.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेकडून डावखुरा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने पदार्पण केले. ऑफस्पिनर केशव महाराज आणि अष्टपैलू डोनोवेन फरेरा यांचा समावेश होता. त्याचवेळी भारताने आपल्या अंतिम अकरामध्ये कोणताही बदल केला नाही.

दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांना खातेही उघडता आले नव्हते. तिसर्‍या सामन्यातही गिलने निराश केले. गिलने डावातील पहिले षटक टाकणाऱ्या बर्गरच्या तीन चेंडूंवर चौकार मारले. पुढच्याच षटकात जैस्वालने मार्करामला लक्ष्य करत त्याच्या षटकात दोन चौकार आणि एक षटकार लगावला. डावातील तिसरे षटक टाकायला आलेल्या महाराजने गिलला (१२) पायचीत टिपले आणि पुढच्याच चेंडूवर तिलक वर्माला (०) मार्करामकरवी बाद केले. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर जात असतानाही केवळ यशस्वीच्या सांगण्यावरून गिलने रिव्ह्यू घेतला नाही.

सुरुवातीच्या विकेट झटपट पडण्याचा जैस्वालवर परिणाम झाला नाही आणि त्याने आक्रमक शैलीत खेळ सुरूच ठेवला. त्याने विल्यम्सला षटकार ठोकला, तर सूर्यकुमारने महाराजच्या षटकात चौकार मारून भारताच्या ५० धावा ४.२ षटकात पूर्ण केल्या. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत भारताने २ बाद ६२ धावा केल्या. यादरम्यान भारताच्या १० षटकांत २ बाद ८७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर सूर्यकुमारने महाराजच्या गोलंदाजीवर ऑफ साइडला शानदार षटकार ठोकत धावफलक हलता ठेवला. दरम्यान, यशस्वीने विल्यम्सच्या गोलंदाजीवर एक धाव घेत ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारताच्या १०० धावा ११.२ षटकात पूर्ण झाल्या.

फेहलुकवायोच्या पहिल्याच षटकात सूर्यकुमारने एक षटकार आणि एक चौकार ठोकला. त्यानंतर ३२ चेंडूत एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. फेहलुकवायोने पाचव्या चेंडूवर सूर्यकुमारला पायचीत करण्यासाठी स्लो लेग कटर टाकला पण भारतीय कर्णधाराने लेग साइडला एक लांब षटकार मारला. या षटकात भारताने २३ धावा जोडल्या. या षटकात सूर्यकुमारने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. पुढच्याच षटकात षटकाराच्या प्रयत्नात यशस्वी शम्सीच्या चेंडूवर रिझाकरवी झेलबाद झाला. डावातील शेवटचे षटक टाकणाऱ्या विल्यम्सच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत ५५ चेंडूत त्याने आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. यानंतर जडेजा धावबाद झाला आणि जितेश शर्माची विकेट पडली. अखेरच्या दोन षटकांत भारताने ४ विकेट गमावल्या.

दक्षिण आफ्रिकेच्या टूरवर असलेल्या भारतीय संघाचा पुढील एकदिवसीय सामना १७ डिसेंबर रोजी दुपारी १:३० वाजता जोहान्सबर्ग येथे सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेत ३ सामने आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा