मालवण
राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करून वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक व्यवसाय करीत असताना बंदर विभाग आम्हाला अनधिकृत ठरवून चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत आहे.त्यामुळे वॉटरस्पोर्ट्सशी संबंधित शेकडो व्यावसायिक मालवणच्या बंदर कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडतील,असा इशारा या व्यावसायिकांनी बंदर निरीक्षकांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी रुपेश प्रभू, राजन कुमठेकर, स्वप्नील मोंडकर, अभिनय चोपडेकर, तांडेल,अन्वय प्रभू, वैभव खोबरेकर, मनोज मेथर, फ्रन्सिस फर्नांडिस, रश्मीने रोगे आदींसह सर्व वॉटर स्पोर्ट व्यावसायिक उपस्थित होते. वॉटर स्पोर्ट्स अनधिकृत ठरवत बंदर विभागाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा सुरु केला असून आज बंदर अधिकारी किनाऱ्यावर कारवाईसाठी गेले असता संतप्त झालेल्या मालवण, दांडी,देवबाग आणि चिवला बीच येथील वॉटर स्पोर्ट्स प्रतिनिधींनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत बंदर निरीक्षकांना जाब विचारला.
वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्याबाबत परवानाधारक व्यवसायिकांना जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी कोरोना नियमावली जाहीर केली असून त्याची प्रत बंदर विभाग मुंबई याना सादर झाली आहे.असे असताना कोरोना खबरदारी म्हणून नियमावली नाही असे सांगत बंदर विभाग कोणत्या नियमाने कारवाई करते ? आमच्याकडे काही जणांकडे बोट सर्व्हे सर्टिफिकेट नाही म्हणून कारवाई होत असेल तर आम्ही सर्व्हे रक्कम भरली आहे. मात्र बंदर विभाग सर्व्हे विभागाकडून यावर्षी सर्व्हे झाला नसेल तर यात आमची चूक काय ? अशी प्रश्न काही व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे उद्या १२ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन छेडण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे.