सावंतवाडी
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठ सॅनिटाईझ करण्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुसऱ्यांदा मळगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. यावेळी बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे संजू विर्नोडकर टिमच्या सहकार्यातून कोरोना प्रतिबंधक जंतुनाशक फवारणी करण्यात आली. मळगाव परिसरात सापडलेले कोरोना बाधित रुग्ण व झालेले मृत्यू याची गंभीर दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने सलग तीनही गुरूवार बाजारपेठ स्वच्छता व निर्जंतुकीकरण ऊपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. मळगाव ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने पण गंभीर दखल घेत बाजारपेठ बंद ठेवून निर्जंतुकीकरण फवारणी करण्यास सहकार्य केले. यात ग्रामपंचायत कर्मचारी, व्यापारी, ग्रामस्थ या ऊपक्रमात सहभागी झाले. मळगाव ग्रामपंचायत परिसर, रस्तावाडी, संपूर्ण बाजारपेठ, वेंगुर्ला पोलीस लाठी आदी ठिकाणी ही जंतुनाशक फवारणी करण्यात आली. टिमतर्फे संतोष तळवणेकर, तुषार बांदेकर व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिवसेना तालुका प्रमुख व पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, भाजपचे माजी सभापती राजु परब यांनी संजू विर्नोडकर व सहकाऱ्यांचे आभार मानले.