You are currently viewing रंग मानवतेचा

रंग मानवतेचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

*रंग मानवतेचा*
—————————
” अग , परवापासून नवरात्र सुरू होते आहे .नऊ दिवस शक्ती आराधना , उपासना , भक्तीरसात सगळे न्हाऊन निघतील . आम्ही सगळ्यांनी नऊ दिवसाचे नवरंग आपणही साजरे करूया . त्या त्या दिवसांच्या या रंगोत्सवात आपल्या आॅफिसातील पुरूष मंडळींनीही सहभागी व्हायचं आहे बरं ” स्नेहलता सीटीओ ( CTO  computer terminal operator ) बोलत होती .
तुमचं लेडिजचं ठीक आहे हो . आम्ही पुरूष कसं एवढं साधणार .एवढी रंगसंगती कोठून आणायची ” हेड कशियर किशोर बोलत होते .
काय सांगताय किशोरजी भरपूर निरनिराळ्या कलरचे शर्ट आहेत तुमच्याकडे . काही ठेवणीतील कपडेही शोधा . एक दोन कलर कमी पडले तर नवीन खरेदी करा की . दसर्‍यालाही उपयोगी पडतील .”
वनिता ने स्नेहलताची री ओढली होती .
पण आमचं काय सांगणार . आम्हांला तर युनिफाॅर्म असतो ना .” प्यून जोशी व दफ्तरी निरगुडे बोलत होते . ” नऊ दिवस तुम्हांला सूट देतील मॅनेजर मॅडम . देणार ना मॅडम .” केतकीने माझ्याशी संवाद साधला .
” हे बघा , तुम्ही सण साजरे करतात . आपल्या संस्कृतीचं जतन करतात , त्यातून एकोपा साधतात . चांगली गोष्ट आहे. I like it .ठीक आहे तुम्हांलाही रंगांच्या या उत्सवात सामील होता येईल . फक्त त्याकाळात रिजनल वा झोनल आँफीसमधून कोणाची व्हिजिट नसावी . तसं असेल तर मी आधी सांगेनच तुम्हांला . आणि सरप्राइज व्हिजिट झाली तर मी सांभाळून घेईन सगळं ” ” ए , हिप हिप हुर्रे ” .चलो ईस बातपर कुछ हो जाए ” ” बस , तुम्हांला तर कारणचं हवं सेलिब्रेशनसाठी ” मी हसत हसत उद् गारले .” जा रे विवेक सँडविचेस घेऊन ये .बघ स्टेशन काम्लेक्स मधील अजय स्वीटमध्ये चांगले मिळतात . चांगले गरमागरम ग्रील सँडविचेस आण , आणि हो श्री डेअरीमधून लस्सी पण आण .” ” या , ब्रेव्हो मॅम , मॅम तुम्ही आहात म्हणूनच हे सगळं शक्य होतं .खूप प्रोत्साहन देतात मॅम आपण . थँकू सो मच ” ” थँकू काय ? माझ्या स्टाफला प्रोत्साहन देणं माझं कर्तव्यच आहे . तसेच कामाकडेही आम्हांला आता विशेष लक्ष द्यायचंय .यावेळेचं टार्गेट माहित आहे ना . अजून जवळजवळ चाळीस टक्के बॅकलाॅग आहे . लवकर पूर्ण करायचाय .” ” होय मॅम , आम्ही सगळे आहोत ना . यापूर्वी ही सगळे टार्गेट पूर्ण केलेतच ना आपण . यावेळीही करू ”

लंच ब्रेक संपला . पुन्हा ग्राहक वेळ सुरू झाली .ँ

उद्याचा रंग आहे मोरपंखी ( peacock green ) हा रंग नाही आहे माझ्या स्टाॅकमध्ये .हिरव्या रंगात मोडणारा कोणता तरी ,पोपटी , चटणी कलर , चालवून घेऊ .नाहीतरी नवरात्र आणि रंगांचं काॅम्बिनेशन असं कोणत्याही शास्रात सांगितलेलं नाही.आपल्या आनंदासाठी आणि दुकानदारांच्या भल्यासाठीही .माझ्याच विनोदावर मी मनातच हसले .

चला आज दुकानदाराचं भलं करूया .तत्पूर्वी काही पूजासाहित्य व फराळाचं जिन्नसही मला खरेदी करायचं होतं .मी बाईक पार्क केली आणि खरेदीसाठी वळले तसे एक पंचाहत्तर / शहात्तर वर्षीय आजोबा माझे समोर आले .फिक्कट पिवळट काहीसा मळलेला पायजमा व शर्ट , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा बरेच दिवसात बदललेला नव्हता .डोक्यावर टक्कल पण कानाजवळ काही केस अजून शाबूत होते .पोट खपाटीला गेलेलं . बहुधा रोजच अर्धपोटी राहात असावेत .
” काय हवं आजोबा .” ” माफ कर पोरी मला.मी तुझी वाट अडवली .  ” ” बेटा , नवरात्रेचे दिवस आहेत , आणि या दिवसात माझ्या नातीचा जन्म झालाय .साक्षात दुर्गेने जन्म घेतलाय .मला भेटायच. आहे नातीला .” ” मग भेटा की आजोबा . कोठे राहातो तुमचा मुलगा .” ” इथेच एलिट पार्कमध्ये राहातो .वाचमन मला जाऊ देत नाही ” ” का नाही जाऊ देत .” ” कोणाकडे जायचे ? का जायचे ? तुम्ही त्यांचे कोण ? सगळं सांगितलं . पण माझ्या अवताराकडे पाहून मला कोणी जाऊ देत नाही . ” ” मग तुमच्या मुलाचा फोन नंबर असेल ना तुमच्याकडे. त्याला फोन करा ना तुम्ही . ” ” ताई , माझ्याकडे कोठला फोन . तुम्ही करता काय तेवढा फोन आणि बोलतात का माझ्या मुलाशी ” ” ठीक आहे , द्या फोन नंबर . ” आजोबांनी शर्टाच्या खिशातून चुरगळलेला एक जिर्ण कागद काढला ज्यावर फोन नंबर नमूद होता . मी फोन केला . ” हॅलो कोण बोलतेय ” ” मी संध्या शिरभाते , बँक आॅफ बडौदा ,मुलूंड शाखेची मॅनेजर ” ” बोला मॅडम , काय काम होतं .” ” अहो हा फोन नंबर , माझेसमोर एक आजोबा आहेत विनायक दामले , त्यांनी दिलाय . तुम्ही चिरंजीव आहात त्यांचे . तुम्हांला मुलगी झाली आहे . अभिनंदन . आजोबा तिला भेटू इच्छितात . नातीच्या मुखदर्शनासाठी आसुसले आहेत बिचारे .वाचमन त्यांना सोडत नाही आहे . तुम्ही जरा खाली येऊन त्यांना घेऊन जा ना ”
” हॅलो मॅडम , तुमचा काहीतरी गैरसमज झालाय , विनायक दामले जे कोणी सद् गृहस्थ आहेत , ते माझे वडील नाहीत . त्यांचा माझा काहीही संबंध नाही .म्हणून वाचमनही सोडत नाही आहे .मी खाली येणार नाही . मला वाटतं आपलाही गैरसमज आता दूर झाला असेल ” . तिकडून सुरेश दामलेंनी फोन ठेवला .

आजोबा काय समजायचं ते समजले आणि निघाले . ” माफ कर बेटा मला , तुला मी त्रास दिला ” ” त्रास कसला आजोबा , पण तुमचा मुलगा का नाकारतोय तुम्हांला .” ” पैसा , पैसा बोलतो ताई .पैसेवाला झालाय तो , गरीब फाटक्या बाबाला विसरला .या उच्चभ्रू वस्तीत राहातोय ना , तो ही माझाच पैसा बरं का .पै पै साठवलेला . जन्मभर झिजलो , त्याला चांगलं शिक्षण दिलं . चांगल्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी झाला . त्याच्याच आॅफीसातील मुलीशी लव्ह मॅरेज केलं . मुलाच्या सुखासाठी ते ही स्विकारलं . गरीब वस्तीत राहाणं यांना खटकू लागलं.क्वार्टर मिळत होतं पण यांना स्वतःचं घर हवं होतं , तेही अशा उच्चभ्रु वस्तीत . करोडोंची किंमत ,बँकेतून कर्ज घेतलं ,पैसे कमी पडत होते म्हणून आमचं घरही विकलं .मुलाचं भलं होतंय व त्यांच्या सुखात आपलं सुख म्हणून मी व माझ्या पत्नीनं तो ही त्याग केला .

नवीन घरात राहायला आलो आणि आम्ही त्यांच्यासाठी अडगळ ठरलो .एक छोटीशी खोली आम्हांला दिली . घरात आम्ही जणू उपरे . कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही . ते जे देतील तेवढंच घ्यायचं . पुढे ड्राईंग रुममध्ये यायचं नाही .कोणाशी बोलायच नाही .कोणाशी सामना झालाच तर ” गावाकडचे पाहुणे आलेत दोन दिवसासाठी , गावठी आहेत . मॅनर्स नाहीत ” अशी ओळख . जा तुम्ही आता आतमध्ये .

माझ्या पत्नीला दम्याचा आजार . पण औषधं दिली नाहीत . रात्र रात्र खोकत बसायची . वरून यांचा त्रास , काय म्हातारीची कटकट आहे नुसती .गेली बिचारी , तळमळत गेली . माझा आधार गेला . ती गेली .आणि सूनबाईला तर रान मोकळे झाले . माझी तर आता जास्तच अडचण वाटू लागली . मला हुसकावण्याचे बहाणे शोधले जात होते .” कोठे आज यांनी गिझरचं चालू ठेवलं , तर यांच्या धांदरटपणाने टेबलवरची फुलदाणीच फुटली असे अनेक कारणं शोधली जात होती .

आणि एक दिवस नातवाला शाळेतून आणतांना , ” आजोबा मला , बुढ्ढीचे बाल घेऊन द्या . लाल , पिवळ्या , गुलाबी रंगातील ते बुढ्ढीचे बाल त्याला हवेच होते . ” होय बाबा घेऊन देतो . पण बाळाला तेवढा धीर नव्हता , रस्त्याच्या त्या कडेला विक्रेता होता .तो धावतच सुटला आणि रस्त्यावर एक कार भरधाव आली . एका दुसर्‍या मुलाच्या पालकाने त्याला आवरले व अनर्थ टळला . सूनबाईला ही गोष्ट कळली आणि माझं त्या घरातलं स्थान संपुष्टात आलं .अगदी अंगावरच्या कपड्यानिशी निघालो . आणि असा भटकतोय .आता माझ्या वयाकडे पाहून कोणी कामही देत नाही आणि मी काही करूही शकत नाही .दिवसा कोणी काही दिलं तर खातो , पण भीक मागत नाही आणि रात्री कोठेतरी आश्रय घेतो .

” बरं आजोबा , तुम्ही काहीतरी खाऊन घ्या . “मी त्यांना वडापाव , भजी खाऊ घातली . त्यानंतर चांगला गरम चहाही पाजला .

” आजोबा , चला माझेसोबत ” ” कोठे ” तुम्ही चला तर अगोदर . ” ” मी ” मातृ सदन ” वृद्धाश्रमाच्या ट्रस्टींशी बोलले . माझ्या बँकेत त्यांचे अकाऊंटही होते . परिचय होताच . ” मॅडम , काही प्रोसेस आहेत , त्या पूर्ण कराव्याच लागतील . ” ” आॅफकोर्स सर ” त्यांनी दिलेल्या कागदपत्रांवर मी सही केली आणि आजोबांचा वृद्धाश्रम प्रवेश झाला .

” आजोबा आता कोठे भटकू नका . राहा इथे आनंदाने . काही गरज वाटलीच तर मला फोन करा . हे माझं कार्ड ठेवा तुमच्याजवळ ”

मी निघाले होते नवरात्रीच्या नवरंग च्या कपडे खरेदीसाठी , ते तर मी खरेदी करू शकले नाही पण मानवतेचा अनोखा रंग मला आज गवसला होता.
——————————————————————
डाॅ. शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई
मो.9764808391

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा