– राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
मुंबई
मुंबईसह राज्यभरात रक्ताची वाढती मागणी लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तरुणाईला रक्तदानाबाबत साद घातली आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ अशा रक्तदानाचे महत्व जाणून तरुण तरुणींनी स्वत:हून पुढे येत रक्तदान करावे आणि राज्यातील रक्ताची कमतरता भरून काढावी, असे आवाहन श्री.यड्रावकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील आमची तरुणाई कुठे कमी पडली नाही आणि पडणारही नाही, अशा बिकट परिस्थितीत आपल्याला तरुणाई सहकार्य करेल, असा विश्वास राज्यमंत्री यड्रावकर यांनी व्यक्त केला आहे. रक्त संकलनासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
राज्यातील रक्तपेढ्यांकडील रक्तसंकलन आणि रक्तसाठा तसेच मुंबईसह राज्यातील अनेक रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांवरील नियमित शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी रक्ताची मागणीत दररोज वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून श्री.यड्रावकर दररोज माहिती घेत असून आवश्यक त्या सूचना देत आहेत.