You are currently viewing *”शिबिरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास होतो!”

*”शिबिरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास होतो!”

*”शिबिरांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास होतो!”*

पिंपरी

“शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो!” असे प्रतिपादन उद्योजक आनंद ढमाले यांनी माले, तालुका मुळशी येथील नाग्या कातकरी वसतिगृहात नुकत्याच संपन्न झालेल्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन करताना केले. खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, वनवासी कल्याण आश्रम आणि लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या निवासी शिबिरात इयत्ता चौथी आणि पाचवीतील सुमारे १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वसतिगृह अधीक्षक जितेंद्र शर्मा, मुख्याध्यापक नटराज जगताप, लायन्स क्लबच्या अध्यक्ष रजनी देशपांडे, जया शिंगवी, मीरा गलांडे, विदुला पेंडसे, अनिता वझे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे, लोकमान्य टिळक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बाल विभागप्रमुख आशा हुले, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी रमेश आठवले, लेखा परीक्षक प्रसाद देव, विश्वास बागूल, व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, वैज्ञानिक अंकिता नगरकर, स्मिता जोशी यांनी वेगवेगळ्या सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली स्वावलंबन, लेखनकौशल्य, नाट्याभिनय प्रशिक्षण, हसतखेळत गणित, विज्ञानातील गमतीजमती, चित्रकला, सूर्यनमस्कार आणि योगाभ्यास, श्रीराममंदिराची माहिती, मैदानी खेळ, शेकोटीभोवती विविध गुणदर्शन अशा ज्ञान, माहिती आणि कलाकौशल्यांचा पहिल्यांदाच आईवडिलांना सोडून दोन दिवस सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रममाण होत लाभ घेतला.

यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये खालील विद्यार्थी विजेते ठरले. गीता निर्वळ (नाट्याभिनय), सहारा सरवदे, आलिया शेख, रूपाली तायड (सुलेखन), गायत्री गोयेकर, आनम कोतवाल, तानाजी बाराटे, दिव्या मागीलवाड (चित्रकला), अनुराज उकरंडे, आयुष नाटे, समिधा भवार (धावणे); तर कशिश अब्बासी आणि सुमीत वाघमारे यांना शिबिरातील आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.

कृतिका काळे, साक्षी कुरळे, श्रद्धा होनशेट्टे, प्रमोदिनी बकरे या शिक्षिकांनी आणि पालक दीपाली सरवदे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. निसर्गाच्या रम्य कुशीत दोन दिवस रममाण झालेल्या विद्यार्थ्यांचे सृजन बहरून आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा