मुंबई , पुणे येथील अकरा दिवसांच्या गणपतींचे आज विसर्जन
मुंबई / प्रतिनिधी :-
भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी या नावाने संबोधले जाते. या दिवशी शयन अवस्थेत लीन असलेल्या श्रीविष्णूंची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. याच दिवशी गणेशोत्सवाची सांगता करत गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होऊन पार्थिक गणपती पूजन केले जाते. पुढील १० दिवस कुळाचाराप्रमाणे विधिपूर्वक गणेशाचे यथासांग मनोभावे पूजन केले जाते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणपती मूर्तींचे योग्य मुहुर्तावर विसर्जन केले जाते.
मुंबई,पुण्यात दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने गणरायाला निरोप दिला जाईल. अनंत चतुर्दशीला मुंबईतील माहौल कसा असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचं निर्णय घेतला आहे. परिणामी पण यंदाचं चित्र पूर्णत: वेगळं आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. या परिसरातील स्थानिक नागरिक छोट्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी चौपाटीच्या दिशेने येत आहेत. गिरगाव चौपाटी परिसरात महानगरपालिका आणि मुंबई पोलीस दल सज्ज झाले आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, कोरोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होणार आहे.
पुण्यातील गणपती विसर्जनाला अल्का चौकात भक्तांचा महापूर पहायला मिळतो. म्हणूनच या चौकात येणारे पाचही मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद असतात. तर महापालिकेचा एक मंच मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज असतो. परंतु, यंदा कोरोनामुळे अल्का चौकात गणेशभक्तांची गर्दी दिसणार नाही.