शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले स्पष्ट
मुंबई – वृत्तसंस्था
कोरोनामुळे यंदा ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवलं. त्यामुळे मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं नाही. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या परीक्षा होणार आहेत?, यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या वर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच मात्र काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं चालू वर्ष लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास आणि परीक्षेचा विचार शिक्षण विभाग करत आहे.
यासंदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पहिली ते आठवीते वर्ग सुरू करताना वर्गातील विद्यार्थी, शिक्षक संख्या, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या आराेग्याची काळजी घेणे, त्यांची सुरक्षा, कोरोना चाचण्या व वर्गातील नियोजन ही मोठी जबाबदारी आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सरकार योग्य तो निर्णय घेईल, असंही गायकवाड म्हणाल्या.