नौसेना दिनानिमित्त उद्या (सोमवारी) मालवणच्या वाहतुक व्यवस्थेत बदल
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व तारकर्ली येथे भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मंत्री महोदय, अतिमहनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मालवण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.
मालवण दांडी परीसरात राहणा-या लोकांकरीता व वाहनांकरिता तारकर्ली नाका ते देऊळवाडा या मार्गाने न येता शिवाजी पुतळा, तानाजी नाका ते शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा. वायरी व वायरी भूतनाथ येथे राहणा-या लोकांकरीता व वाहनांकरीता वायरी नाका, तारकर्ली नाका, देऊळवाडा असे न येता रेकोबा हायस्कुल ते शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा. तारकर्ली गावातील लोकांकरिता व वाहनांकरिता तारकर्ली, तानाजी नाका, देऊळवाडा या मार्गाचा वापर न करता काळेथर, देवली ते कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा. देवबाग परिसरातील लोकांकरिता व वाहनांकरिता तारकर्ली ते तानाजी चौक नाका देऊळवाडा या मार्गाचा वापर न करता काळेथर, देवली ते कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा.
मालवण सोमवारपेठ गवंडीवाडा, राजकोट, मेढा, भरडनाका येथील लोकांकरीता व वाहनांकरीता देऊळवाडा या मार्गाचा वापर न करता बांगीवाडा, रेवतळे व आडरी मार्ग कुंभारमाठ या मार्गाचा वापर करावा.धुरीवाडा परीसरातील राहणा-या लोकांकरीता व वाहनांकरीता बोडींग ग्राऊंड, कोळंब मार्गे देऊळवाडा या रस्त्याचा वापर न करता झांट्ये काजु फॅक्टरी, स्वरा फार्म, आडारी मार्गे कुभारमाठ या मार्गाचा वापर करावा.
कोळंबमध्ये राहणा-या लोकांकरीता व वाहनांकरीता कोळंब तीठा ते देऊळवाडा या मार्गाचा वापर न करता न्हीवे, कातवड ओझर या मार्गाचा वापर करावा.
मालवण बाहेरील प्रवाशांना व त्यांचे वाहनांना तारकर्ली MTDC येथे मुख्य कार्यक्रमाकरीता जाण्यासाठी देळवाडा, तारकर्ली नाका, ते तारकर्ली या मार्गाचा वापर न करता कुंभारमाठ, शासकीय तंत्रनिकेतन, देवली, काळेघर मार्ग तारकर्ली या मार्गाचा वापर करावा.
तारकर्ली नाका ते तारकर्ली या मार्गाचे समुद्र बाजुला (पश्चिमेकडे) राहणा-या लोकांनी व त्यांचे वाहनाकरीता तारकर्ली MTDC येथे मुख्य कार्यक्रमाकरीता जाण्यासाठी मुख्य रस्त्याचा वापर न करता अंतर्गत रस्त्याचा (समुद्र किनारी मार्गाचा) वापर करावा.
नो पार्कींग बाबत करावयाच्या उपाययोजना
पोलीस विभागाने वरीलप्रमाणे प्रस्तावित केलेल्या मार्गावर दिनांक ०३.१२.२०२३ रोजी सकाळी ०८.०० पासून दिनांक ०४.१२.२०२३ रोजीचे २४.०० या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने अॅम्बुलन्स, दुध टँकर, धान्य वाहतूक, गॅस वाहतूक, भाजीपाला वाहतूक व औषधे वाहतूक तसेच या कार्यक्रमाचे अनुषंगाने MTDC, राजकोट, टोपीवाला येथील कामकाजासाठीची वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यास मान्यता दिली.
अवजड वाहतूक बंद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल-मालवण, आचरा-मालवण, चिपी-मालवण व कुडाळ-मालवण या मार्गावर दिनांक ०३.१२.२०२३ रोजी सकाळी ००.०१ पासून दिनांक ०४.१२.२०२३ रोजीचे २४.०० या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने अॅम्बुलन्स, दुध टँकर, धान्य वाहतूक, गॅस वाहतूक, भाजीपाला वाहतूक व औषधे वाहतूक तसेच या कार्यक्रमाचे अनुषंगाने MTDC, राजकोट, टोपीवाला येथील कामकाजासाठीची वाहने वगळून इतर सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद करण्यास मान्यता दिली.