*कै.वामन नारायण सौदागर जन्मशताब्दी प्रित्यर्थ वाचन साधना कार्यशाळा संपन्न*
*श्री. सुभाषजी शेटगावकर, गोवा यांचे लाभले मार्गदर्शन*
आजगाव (विनय सौदागर):
कै. वामन नारायण सौदागर (बाबा) जन्मशताब्दी निमित्त वर्षभर (३०/८/२३ ते ३०/८/२४) पर्यंत विविध साहित्यिक कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट्य ठेऊन साहित्यिक भोवतालकार विनय सौदागर यांनी मराठी साहित्याची जपणूक आणि वाचन संस्कृती जोपासणा करत आहेत. अलीकडे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने लहान मुलांमध्ये वाचनाची आवड लागावी यासाठी आजगाव, ता.सावंतवाडी येथे वाचन साधना कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हा बाबांची जन्मशताब्दी वर्षानिमित्त ४था कार्यक्रम होता. पुस्तक वाचन कसे करावे याचे निःशुल्क मार्गदर्शन गोवा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. सुभाषजी शेटगावकर यांनी केले. यावेळी एकूण १२ मुली व ८ मुलगे अशा एकूण २० मुलांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
पुस्तक वाचन कसे करावे, याविषयी सात प्रात्यक्षिकांच्या आधारे मार्गदर्शन करण्यात आले. एकूण पावणे दोन तास अप्रतिम मार्गदर्शन झाले. सरांनी विनामूल्य मार्गदर्शन केले, तसेच मुलांना कार्यशाळेसाठीचे वाचन साहित्य व शीतपेय दिले. सुभाषजी शेटगावकर सरांचेच हस्ते ‘पू.गोगटे गुरुजी प्रतिष्ठान’ चा दिवाळी अंक वाचून केलेल्या लेखनासाठीची पारितोषिके प्रदान करण्यात आली. (मुलांनी किशोर अंकाविषयी सुरेख लेखन केले). उल्लेखनीय लेखन- रोहित आसोलकर (रोख रु.२०१ ) देण्यात आले.
यावेळी प्रथम- रोहित आसोलकर (कुल्फी दिवाळी अंक) द्वितीय- खुशी परब ( गोट्या दिवाळी अंक) तृतीय- सानिया शेख ( साधना दिवाळी अंक) विशेष उत्तेजनार्थ- दिया सावंत (रोख- रु. १०१) उत्तेजनार्थ- मानसी पांचाळ, वैभव पांढरे, संचित पांढरे, विष्णू कळसुलकर (प्रत्येकी रोख रु. ५१) दिवाळी अंक माधुरी काकतकर यांचेकडून, रु. २०१ चे विशेष पारितोषिक बबन आडारकर यांचेकडून, तर सर्व उत्तेजनार्थ पारितोषिके अनिता सौदागर यांचेकडून पुरस्कृत करण्यात आली होती. मार्गदर्शक शेटगावकर सरांकडून दरवर्षीच्या उत्कृष्ट वाचक विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी रोख रु.५०१/- चे पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यशाळेत उपस्थित सर्वांना अल्पोपाहार देत कार्यक्रमाची सांगता झाली. भोवतालकार कवी विनय सौदागर, आजगाव, सावंतवाडी मोबा. ९४०३०८८८०२ यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.