You are currently viewing वैभव

वैभव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका सौ.आरती जठार लिखित अप्रतिम लेख*

*वैभव*

प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतोच, निरर्थक असा शब्द सापडणे तसे कठीणच. निरर्थक शब्दालासुद्धा अर्थ असतोच.अर्थानुसार आणि उच्चारानुसार त्या शब्दांना वजन प्राप्त होते. नंतर ते शब्द कोण उच्चारतयं त्यामुळे त्या शब्दांना अधिक वजन प्राप्त होते.असे प्रत्येक शब्दाचे आपण वर्गीकरण करु शकतो.असे कितीतरी शब्द मला खूप आवडतात उदाहरण द्यायचेच झाले तर आश्वासकता, ऋणानुबंध, नियती, सिंहावलोकन, मन,हिंदोळा,असे कितीतरी शब्द आहेत मोठ्ठी यादी होईल त्यांची. त्यातीलच एक शब्द मला खूप भावतो तो म्हणजे *वैभव* खरंच बघा ना! वैभव या शब्दातच वैभव जाणवते. तो शब्द उच्चारला की एकप्रकारे सुबत्ता आहे, हे प्रकर्षानं जाणवतं. हे वाचल्यावर प्रत्येक वाचकसुद्धा हा शब्द उच्चारुन पाहील. जोक्स अपार्ट पण माझ्या म्हणण्याला अर्थ आहे हे नक्की.
आपण वैभव यांचा अर्थ पैश्याची श्रीमंती असा लावतो आणि इथेच चुकतो. पैश्याची श्रीमंती वेगळी (जी प्रत्येकाकडे असेल असे नाही.) आणि वैभव वेगळे. ते कसे? तर वैभव कुठल्याही गोष्टीचे असू शकते पण ते ओळखता यायला हवे. जसे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचेकडे सुरेल आवाजाचे जन्मजात, नैसर्गिक वैभव होते, त्या वैभवामुळे पैसा, यश, प्रसिद्धी आपोआप आले. पण त्यांच्याकडे शैक्षणिकदृष्ट्या प्रथित यशाचे वैभव नव्हते. असे कितीतरी उदाहरणे आहेत.
असे हे वैभव कोणत्याही प्रकारचे असू शकते. उपजत एखादी कला असणं, बुद्धीने एकदम तल्लख असणं, विशिष्ट खेळात प्राविण्य मिळवणं,हे वैभव आपल्या यशापयशाशी संबंधित असते.त्या वैभवाचे आपण परिमाणात गणती करु शकतो जसे अमूक अमूक मार्क्स मिळाले, एवढे प्रमाणपत्र आहेत, एवढे एवढे 🏅 पदकं (मेडल्स), सन्मानचिन्ह मिळाले, आतापर्यंत एवढी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.पण अश्या प्रकारचे वैभव असणारे काहीच जण असू शकतात.मग इतरांचे काय? तर माझ्या मते प्रत्येकाजवळ एकतरी वैभवशाली बाब असतेच, आपल्याला फक्त त्याची जाणीव नसते एवढेच. ते कसे? तर बघा आपल्याला बुद्धिमान आणि विचारी असा मनुष्य जन्म मिळाला हेच सगळ्यात मोठे वैभव आहे, जे प्रत्येकाचे सारखे आहे. पण नंतर त्यात विविधता येत जाते जसे उत्तम संस्कार लाभणे म्हणजे संस्कारित वैभव झाले, उत्तम आरोग्य मिळाले तर ते आरोग्यदायी वैभव झाले.
आपले नातेसंबंध आपला गोतावळा निर्माण करतो, हे नात्यांचे वैभव झाले, या वैभवाची किंमत आपल्या पुढील पिढीला जास्त कळणार आहे. आपले समाजातील स्थान आपले सामाजिक वैभव दर्शविते.
स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्य -जबाबदाऱ्या ओळखून पार पाडणे यासारखे सद्गुण अंगी असणे म्हणजे सद्गुणांचे वैभव.आपण गरजूंना किती मदत करतो, आपण आपले मत परखडपणे सांगू शकतो का? आपले वाक्चातुर्य,यातून आपल्या वकृत्वाचे वैभव कळते.आपले आर्थिक व्यवहार पारदर्शक आहेत का? त्यातून व्यावहारिक वैभव समजते.आपले बोलणे-वागणे यातून व्यक्तीत्वाची छाप पडते तशीच आपल्या विचारांची सुद्धा छाप पडते.यातील कुठल्यातरी एक किंवा अनेक वैभवाने प्रत्येक व्यक्ती वैभवशाली असतेच. या सर्व वैभवांचा दागिना म्हणजे समाधान ,ते आपल्याजवळ किती आहे? आपले वैभव आपल्याला ओळखता यायला हवे नाही का? फक्त आपले वैभव सत्य आणि प्रामाणिक आहे ना ? ह्याची खात्री असावी. तसेच वैभवाचा स्वाभिमान असावा अभिमान नको. एकवेळ अभिमान चालू शकेल पण त्यातून उन्मत्तपणा यायला नको ही काळजी घेता यायला हवा.
कोणालाही हा लेख वाचताना हा प्रश्न पडू शकतो मी वैभवाबद्दल एवढं सांगते आहे,मग माझे वैभव काय? बरोबर आहे ते पण ते मी सांगायला लागले तर दुसरा मोठा लेख तयार होईल.तोही मी कधीतरी लिहीनच. आत्ता इथेच थांबते. आपापले वैभव शोधा आणि मस्त लिहून काढा,बघा तुम्हाला मृगकस्तुरी मिळाल्याचा आनंद होईल.

*सौ.आरती जठार*
डोंबिवली

प्रतिक्रिया व्यक्त करा