म्हादईची कायदेशीर लढाई गोवा सरकार निश्चितच जिंकेल
दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ फुलण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार; मुख्यमंत्री सावंत यांचा विश्वास
सावंतवाडी :
मुख्यमंत्री डॉ . प्रमोद सावंत आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. सावंतवाडीतील माजी आमदार राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयात ते आले होते. यावेळी भाजपच्या पदधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाणी वाटपाचा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या म्हादई नदी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोवा सरकार सक्षम आहे. गोवा सरकारची कायदेशीर टीम त्यासाठी काम करत आहे. त्यामुळे म्हादईची कायदेशीर लढाई गोवा सरकार निश्चितच जिंकेल, असा दावा गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. म्हादई प्रश्नावर आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत. या लढाईत महाराष्ट्रही आम्हाला सहकार्य करेल असा आशावाद डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग आणि गोव्याचे संबंध गेल्या कित्येक वर्षांपासून घट्ट आहेत. येणाऱ्या काळात रोजगाराचा आणि पर्यटनदृष्ट्या विचार करता काम करणे गरजेचे आहे रोजगाराचा विचार करता सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन येतील युवकांसाठी बॉर्डर परिषद घेणे गरजेचे आहे. तसेच मोपा विमानतळाचा पर्यटनाच्या दृष्टीने कितपत फायदा होईल यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नावर गोवा राज्याकडून नेहमी सहकार्याची भूमिका राहिली आहे. यापुढेही ही भूमिका राहणार असून गोवा मेडिकल कॉलेज सोबतच आता गोव्यातील अन्य खाजगी रुग्णालयांतही महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. सिंधुदुर्गातील अनेक रुग्णांसाठी याचा फायदा होणार आहे. लवकरात लवकर यासाठी पावले उचलण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशातील पाच राज्यांमध्ये जनसभा निवडणूक होत आहे. यातील चार राज्यात आपण स्वतः प्रचाराची धुरा सांभाळली होती. पाच पैकी राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या ठिकाणी भाजपाचे कमळ फुलणार आहे तर अन्य दोन राज्यात भाजप विरोधकांना काटे की टक्कर देणार आहे. महाराष्ट्र राज्यातही येणाऱ्या काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपाला जिंकायच्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाचे कमळ फुलण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राजन तेली यांनी सत्कार केला. यावेळी भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, माजी नगरसेवक गुरु मठकर आदी उपस्थित होते.