You are currently viewing ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या..

ख्रिसमसनिमित्त कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या..

मुंबई :

नाताळ व नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. कोकण रेल्वेकडून गोव्याला २२ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

नाताळ व नववर्षाच्या स्वागताला गोव्यात पर्यटकाची मोठी गर्दी असते. नाताळच्या दरम्यान गोव्यात कॉर्निव्हलचे आयोजन केले जाते. त्यामुळे नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना कोकण रेल्वेने खुशखबर दिली आहे.

कोकण रेल्वे गोव्यासाठी २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. नाताळ स्पेशल या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि आणि पनवेल ते करमाळी या स्थानकादरम्यान धावणार आहेत.

सीएसएमटी ते करमाळी (०२०५१ ) ही स्पेशल गाडी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटी स्थानकातून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी २ वाजता थिविमला पोहोचेल.

थिविम – सीएसएमटी (०११५२) ही विशेष दैनिक गाडी थिविम येथून २२ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान दररोज दुपारी ३ वाजता सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

पुणे जं. – करमाळी (०१४४५) विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून २२ आणि २९ जानेवारीला सायंकाळी ५:३० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता करमाळीला पोहोचेल.

करमाळी – पुणे जंक्शन (०१४४६) विशेष (साप्ताहिक) २४ आणि ३१ डिसेंबर रोजी करमाळी येथून सकाळी ९:२० वाजता सुटेल. ही ट्रेन रात्री ११:३५ वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल. गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.

पनवेल – करमाळी ही विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी पनवेल येथून रात्री १० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वा. ही गाडी करमाळीला पोहोचणार असून, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, रोहा स्थानकावर थांबणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा