ग्रामस्थांची सतर्कता : अडीच टन धान्य जप्त
कणकवली
सांगवे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रास्त धान्य दुकानातून शासनाकडून कार्डधारकांना वितरित करण्यात येणारे मोफत धान्य काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. यात अडीच टन धान्य तांदळासह टम्पो जप्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर कणकवली तालुका पुरवठा विभागाकडून रास्त दुकान सीलबंद करण्यात आले. सोसायटीच्या रास्त धान्य दुकानातून अडीच टन धान्य तांदूळ घेऊन निघालेला टेम्पो ग्रामस्थांनी संशय आल्यामुळे कनेडी बाजारपेठेत अडविला. त्यानंतर कणकवली तालुका पुरवठा विभागाकडून रास्त दुकान सीलबंद करण्यात आले. तसेच धान्यासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला. सांगवे गावातील ग्रामस्थांना रास्त धान्य दुकानातून अनेकवेळा धान्य उपलब्ध होत नाही, अशी वारंवार तक्रार होत होती. दुकानातून मोफतचे धान्य तालुक्याबाहेर नेले जाते, अशी चर्चा होती, मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रास्त धान्य दुकानातून टेम्पोमध्ये तांदळाची पोती भरली जात होती. टेम्पो बाजारपेठेमध्ये आल्यानंतर बेनी डिसोजा, लॉरेन्स डिसोजा यांनी अडविला. टेम्पो चालकाने आपण देवगड येथील असल्याचे सांगितले. नागरिकांसाठीचे मोफत धान्य परस्पर काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचे उघड झाल्यानंतर बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी काही ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला, लॉकडाऊन काळात गेले आठ महिने अशाप्रकारे परस्पर धान्य विकले जात असून त्यामधून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे, यात मोठे रॅकेट आहे, आमदार नितेश राणे निकटवर्तीय असलेल्या माजी जिल्हा परिषदअध्यक्ष संदेश सावंत व माजी सभापती सुरेश सावंत यांच्या ताब्यात सांगवे विकास सोसायटी आहे, सोसायटीतील काही कर्मचारी धान्याचा काळाबाजार करत असतानाही त्याला एका स्थानिक नेत्याचे पाठबळ होते. पुरवठा विभागाकडून जप्तीची कारवाई केली जात असून काही जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत.