You are currently viewing सिंधुदुर्गात सिंधुफिल्मसिटी उभारावी!

सिंधुदुर्गात सिंधुफिल्मसिटी उभारावी!

लावण्यसिंधू चित्रपट सहकारी संस्था अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांची मागणी

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा 1997 साली देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हय़ात अजूनही आवश्यक सोयीसुविधा निर्माण झालेल्या नाहीत. जिल्ह्यात पर्यटनाबरोबरच सिंधुफिल्मसिटी निर्माण झाल्यास प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतील. त्यासाठी राज्य सरकारने सिंधुफिल्मसिटी उभारण्यासाठी सुरुवातीला 300 कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी लावण्यसिंधू चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी शासनाकडे केली आहे.
महाराष्ट्राची शान असलेल्या आणि हजारो कोटींचा रोजगार मिळवून देणारा मुंबईतील फिल्मसिटी उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक फिल्म निर्मात्यांशीही चर्चा केली. सुशांतसिह आत्महत्या प्रकरणानंतर मुंबईतील फिल्म उद्योगाबाबत अनेक चर्चाना उधाण आले होते. परंतु कोकणची नाळ असलेल्या मुंबईतील फिल्म उद्योगास अधिक सशक्त बनविण्यासाठी कोकणच्या निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या सिंधुदुर्गात सिंधुफिल्मसिटी निर्माण करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्याच्या समुद्रकिनारपट्टीचा फिल्म शुटिंगसाठी फारमोठा लाभ घेता येईल. नव्याने सिंधुदुर्गात होणाऱ्या विमानसेवेचा आणि रेल्वेचाही लाभ या उद्योगास होईल. तसेच सिंधुदुर्गच्या पर्यटन वाढीस अधिक वेग येऊ शकेल, असा विश्वास उपरकर यांनी व्यक्त केला आहे. मात्र, राज्य सरकारने सिंधुफिल्मसिटीकरिता जमीन खरेदीसाठी सुमारे 100 कोटी व इतर अनुषंगिक सुविधा उभारणीसाठी सुमारे 200 कोटी निधी मंजूर करणे आवश्यक आहे. भविष्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेले अंग्रीया बँक प्रकल्प, मरिन पार्क, सीवल्ल्ड, पंचतारांकित हॉटेल प्रकल्प यामुळे सिंधुफिल्मसिटी प्रकल्प सिंधुदुर्गास वरदान ठरू शकेल. शिवाय हा प्रकल्प सहकारी तत्वावर गुंतवणूक करून उभारल्यास गुंतवणूकदारांना मोठया प्रमाणावर लाभ घेता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा