चौके माजी सरपंच राजा गावडे यांची आग्रही मागणी
मालवण / चौके :
पोलिस पाटील पदे त्या त्या गावातील स्थानिकांमधूनच भरण्यात यावी अशी आग्रही मागणी अनेक गावातून समोर येत आहे. तरी शासन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी चौके गावचे माजी सरपंच राजा गावडे यांनी केली आहे.
जिल्ह्यात रिक्त पोलिस पाटील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इच्छुकांनी अर्ज भरावयाचे आहेत. उपलब्ध माहितीनुसार रिक्त पदासाठी निश्चित केलेल्या आरक्षित व खुल्या प्रवर्गासाठी अन्य गावातील कोणीही अर्ज करू शकतात असे समजते. मात्र पोलिस पाटील हे त्या गावातीलच रहिवासी असणे गरजेचे आहे. कारण रात्री बेरात्री एखादा गुन्हा, अपघात, दुर्घटना घडली, वाद निर्माण झाल्यास प्रथम पोलिस पाटील यांना खबर दिली जाते. विविध प्रकारच्या शैक्षणिक व महसुली दाखले पोलिस पाटील यांच्या कडून घ्यावे लागतात. वारस तपास प्रकरणी पोलीस पाटील यांनी दिलेले दाखले ग्राह्य मानले जातात. यासाठी पोलिस पाटील हे गावातील स्थानिक असणे फार गरजेचे आहे. रिक्त पोलिस पाटील पदे भरताना त्या त्या गावातील स्थानिकांमधूनच भरण्यात यावीत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून प्रशासनास पाठवावे. अशी मागणी चौके माजी सरपंच राजा गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.