*ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख..*
*ग्राम समृद्धी*
जीवनाची संकल्पना आनंद आणि समृद्धी आहे. गावांचा सामुदायिक विकास करण्यासाठी मी गावोगावी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट व आनंद प्राप्त होण्यासाठी मी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी चालू आहे. समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची उद्दिष्टे गावातील प्रत्येक व्यक्तीला आनंदी करणे आणि समृद्धि करणे हे आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू गावातच बनून पुरवठा करणे, त्यायोगे गावातील पैसा गावातच ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचा पैसा गावात आला पाहिजे. म्हणून गावातील तयार माल बाहेर विक्रीला गेला पाहिजे.
नैसर्गिक शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे व रासायनिक खते आणि कीटकनाशके गावातून तडीपार करण्यासाठी मी एक मोठी चळवळ उभी केली आहे. गेली ७ वर्षे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नैसर्गिक शेती उपक्रम राबविण्यात येत आहे. विषमुक्त अन्न, प्रदूषण मुक्त, पाणी, हवा, पर्यावरण, सुखी व आनंदी जीवन हा प्रत्येक सजीवाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी विषमुक्त अन्न मिळणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी नैसर्गिक शेतीची कास धरणे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिक शेती म्हणजे जे निसर्गात दिसते ते. निसर्गाची स्वयंपूर्ण, स्वयंपोषी व स्वयंविकसित व्यवस्था म्हणजे नैसर्गिक शेती. नैसर्गिक शेती ही सहजीवन पद्धतीची असते. त्यामध्ये आंतर पिकांची लागवड केल्यामुळे आर्थिक नफा होतो आणि मुख्य पिकाची उत्पादन क्षमता सुद्धा वाढते. रासायनिक शेतीमध्ये खतांच्या वापरामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढवून जमीन नापीक होते. मात्र नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राहते. नैसर्गिक शेतीतून तयार होणाऱ्या अन्नाच्या सेवनामुळे मानवाचे व प्राण्यांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते. आतापर्यंत माझ्या प्रयत्नातून ५००० पेक्षा जास्त क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले आहे. येत्या उन्हाळी हंगामात ५०० हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नैसर्गिक शेतीची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान सुरू केले आहे. देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्राद्वारे नैसर्गिक शेतीचे प्रयोग प्रचार व प्रसार करण्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे.
हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. यावर्षीच्या पावसाळी हंगामात मी २५ हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य लागवड अभियान राबविले. भरडधान्यास ‘श्री’ अन्न म्हटले जाते. भरडधान्यास पौष्टिक किंवा न्यूट्री सिरीयल्स म्हणून देखील ओळखले जाते. भरडधान्य ऊर्जा व पोषण तत्वांचे आगार आहेत. ही धान्य पचायला हलकी असतात. अनेक भागांमध्ये भरडधान्य हे स्थानिक पीक आहे. भरडधान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी ४१ टक्के पेक्षा जास्त भरडधान्य हे भारतात पिकवले जाते. परंतु शेतकऱ्यांच्या दैनंदिन आहारामध्ये याचे प्रमाण घटले आहे. म्हणून आमच्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाच्या गावांमध्ये यावर्षी २५ हेक्टर क्षेत्रावर नाचणी, बाजरी, ज्वारी, वरी, हरिक व सावा या पिकांची लागवड करण्यात आली. त्यांना मी दर्जेदार सुधारित बियाणे पुरविले. गावागावात भरड धान्यापासून पाककला निर्मितीच्या स्पर्धा घेतल्या. त्यामुळे भरड धान्याचा वापर शेतकरी आपल्या आहारात प्राधान्यक्रमाने करत आहेत. समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. गेली तीन वर्षे मी गावागावात वृक्ष लागवड अभियान राबवीत आहे. यावर्षी विविध संस्थांच्या सहकार्यातून २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. ही मोहीम यापुढे सतत चालू ठेवणार आहे.
गावात थेट रोजगार प्राप्तीसाठी खादी व ग्रामोद्योग आयोग अंतर्गत मी जिजामाता फळप्रक्रिया समूहाची स्थापना केली आहे. या प्रकल्पामध्ये १२ गावांमधील ५२३ फळ प्रक्रिया करणाऱ्या कारागिरांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट कारागिरांना संपूर्ण वर्षभर रोजगार उपलब्ध करून देणे व यांचेकडे उपलब्ध असलेल्या फळांना चांगला बाजारभाव मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाची सामुदायिक सुविधा केंद्र किर्लोस व ओरोस या ठिकाणी कार्यान्वीत आहे. कारागिरांना घरच्या घरी प्रक्रिया करण्यासाठी यंत्र सामुग्री देण्यात आली आहे. पदार्थ विक्रीसाठी विक्री केंद्राची स्थापना केली आहे. या प्रकल्पामुळे ५२३ कारागिरांना शाश्वत रोजगाराचे दालन सुरु झाले आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत या प्रकल्पामध्ये सहभागी लाभार्थ्यांची क्षमता बांधणे आणि कौशल्य विकास इत्यादी बाबींवर प्रशि%E