कुडाळ :
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली- हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका) रघुनाथ तेंडोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल आज आमदार वैभव नाईक यांनी यशवंत तेंडोलकर यांच्या तेंडोली येथील निवासस्थानी भेट देऊन शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, दीपक आंगणे, दशावतारी नाट्य कलाकार दिनेश गोरे, कणकवली युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, ग्रा. प. सदस्य बाळू पारकर, आकाश मुननकर, कौशल राऊळ, मीनाक्षी वेंगुर्लेकर, रवींद्र खानोलकर, संतोष तेंडोलकर, प्रमोद खानोलकर, विशाखा चव्हाण, धाऊ खरात(मोरे), तेजस चव्हाण अमित राणे आदी उपस्थित होते.
यशवंत तेंडोलकर यांना दशावताराची आवड असल्याने त्यांनी या कलेत पदार्पण केले. त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीचा त्यांनी सामना करीत या कलेत लौकिक प्राप्त केला. दशावतारातील अनेक विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या. गेली अनेक वर्षे ते दशावतार कला जोपासत आहेत. भीष्म, दक्ष, विश्वामित्र, विनोदी ब्राह्मण अशा विविध ढंगी, विविध अंगी भूमिका साकारत त्या अजरामर केल्या आणि आजही सत्तरीच्या दारातही त्याच जोशात भूमिका साकारत आहेत. संयुक्त दशावतार संचात ते काम करतात. त्यांनी अनेक पौराणिक व काल्पनिक कथानके लिहिली आहेत.