You are currently viewing साधी राहणी व उच्च विचार असलेली, नैतिकता व प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असणारी महान विभूती म्हणजे मधु दंडवते – उमेश गाळवणकर

साधी राहणी व उच्च विचार असलेली, नैतिकता व प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असणारी महान विभूती म्हणजे मधु दंडवते – उमेश गाळवणकर

कुडाळ :

“साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, नैतिकता व प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असणारी, निष्कलंक महान विभूती म्हणजे मधु दंडवते होय.कोकण रेल्वे मार्फत कोकणच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे माजी रेल्वेमंत्री माजी केंद्रीय अर्थमंत्री मधु दंडवते यांचे योगदान विसरण्याजोगे नाही. मुंबईसह महाराष्ट्र ,गोवा ,केरळ, कर्नाटक या राज्यांच्या विकासाला गती देणारी कोकण रेल्वे सुरू करून मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस यांनी जी अद्वितीय कामगिरी केलेली आहे त्याला तोड नाही. अशा महान व्यक्तीचे स्मृतिदिन व पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्याची सतत जाणीव ठेवणे, त्यांच्या योगदानाचे स्मरण ठेवणे हे कोकण रेल्वेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे‌” असे उद्गार बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी काढले. ते कुडाळ रेल्वे स्थानक येथे प्रा.मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करताना बोलत होते .

त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये ‘जॉर्ज फर्नांडिस,प्रा. मधु दंडवते यांनी बॅ. नाथ पै यांचे कोकण रेल्वेचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी जो काही धोरणात्मक निर्णय घेतला त्याची फलश्रुती आज कोकणवासीय अनुभवत आहेत .असे महात्मे त्यांचं कार्य त्यांचे विचार आपल्या सर्वांची अमोल संपत्ती आहे आणि अशा महात्म्यांचे ऋण व्यक्त करणे व नव्या पिढीला त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणे हे आपले परमकर्तव्य ठरते. या पवित्र उद्देशाने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली जाते. असे सांगत ‘मधु दंडवते अमर रहे’ च्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी त्यांच्यासोबत अमृता गाळवणकर,प्रा अरुण मर्गज,स्टेशन मास्तर दीपक पाटकर, कोकण रेल्वेचे कर्मचारी व्हि.आर सावंत, एम.जे चव्हाण, तुषार राऊळ ,लाडू परब, पांडुरंग पाटकर,संतोष पडते,प्रसाद कानडे ,सुनील गोसावी व रेल्वे प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा