सिंधुदुर्ग:
लोक अदालत म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरणे निकाली काढण्यासाठी तडजोडीचा सुखद मार्ग आहे. यामुळे आपली न्याय प्रविष्ट तडजोड स्वरूपाची प्रकरणे मिटविण्यासाठी ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.या लोक अदालतीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाने केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यत मा उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ या दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केलेले आहे. सन २०२३ या वर्षातील हे चौथे लोकअदालत आहे. जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग ओरोस, दिवाणी न्यायालय (व.स्तर) — सिंधुदुर्ग, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सिंधुदुर्ग या न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकन्यायालयात पक्षकारांनी नेमून द्यावीत.
दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे आदी तसेच दाखलपूर्व प्रकरणे शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे न्यायालयाच्या संबंधित अधीक्षक अथवा लिपिक यांना कळवावे.असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक न्यायालयात तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, जीवन सुखमय होऊ शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यवसान कायमस्वरुपी वादात होणार नाही, वैराने वैर वाढतच राहते, असे होऊ नये यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोकन्यायालयाचा हेतू आहे. शिवाय या निकालाविरुद्ध अपिल होत नाही, वेळ व पैशांची बचत होते. असेही जिल्हा विधीसेवा प्राधिकरण च्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.