सर्जेकोट संबंधित सागर सुरक्षा दल सदस्याच्या निलंबनाची कारवाई करण्याची मागणी
मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन
मालवण :
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरित्या मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई करण्याबरोबरच अन्य मागण्यांसदर्भात आक्रमक बनलेल्या मच्छिमार महिला व अन्य मच्छिमारांनी आज येथील सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन छेडले. दरम्यान तीन तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसायच्या सहायक आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी सर्जेकोट येथील संबंधित सागर सुरक्षा दलाच्या सदस्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल यासह अन्य मागण्यांवर आवश्यक कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर महिला व अन्य मच्छिमारांनी आंदोलन स्थगित केले.
तळाशील येथे पारंपरिक मच्छिमार व पर्ससिनधारक यांच्यात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर पारपरिक मच्छिमारांवर गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर तळाशील, शहरातील सर्व पारंपरिक मच्छिमार आक्रमक बनले आहेत. यात येथील मच्छिमारांनी काल पासून मासेमारी व मासळी विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात तळाशील येथील मच्छिमारांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संतप्त बनलेल्या महिला व अन्य मच्छिमारांनी आज दुपारी येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयावर धडक दिली.
शेकडोंच्या संख्येने दाखल झालेल्या मच्छिमारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार पोलीस निरिक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक बी. ए. सुतार, सुशांत पवार, कैलास ढोले, श्री. आंबेरकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, वृषा पाटील, भक्ती पावसकर आदी घटनास्थळी दाखल झाले. महिला अधिकच आक्रमक बनल्याने त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी मिथुन मालंडकर, मच्छिमार नेते बाबी जोगी, रविकिरण तोरसकर, अन्वय प्रभू, भाऊ मोर्जे, सेजल परब, रश्मीन रोगे, सुर्वी लोणे यांच्यासह शिंदे शिवसेनेचे बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर दाखल झाले.
तळाशील येथील मच्छिमारांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली आहे. पर्ससीनच्या नौकेवर जे खलाशी होते त्यांची नोंद मत्स्य व्यवसायच्या कार्यालयात आहे का? याची माहिती देण्यात यावी. त्याचबरोबर अनधिकृतरित्या होणाऱ्या पर्ससीनच्या मासेमारीला सर्जेकोट बंदरातील सागर सुरक्षारक्षक दलाचा सदस्य सहकार्य करत आहे. त्यामुळे त्याचे तत्काळ निलंबन करण्यात यावे अशी जोरदार मागणी महिलांनी केली. मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने महिला अधिकच आक्रमक बनल्या. महिलांनी मत्स्य व्यवसाय कार्यालयाच्या बाहेरील कार्यालयाचा फलक उचकटून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले.