राजापूर :
राजापूर येथील अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने बँकेच्या वतीने ४ व ५ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा शताब्दी सांगता समारंभ भव्य दिव्य स्वरूपात होणार असून याला बँकेच्या सर्व सभासद, ठेवीदार,कर्जदार आणि हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केले आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काझी व शतक महोत्सव सांगता समितीचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांनी ही एकूणच कार्यक्रमाची माहीती दिली.
शताब्दी महोत्सव वर्षात कोरोनाचा प्रादुभाव असल्याने हा सांगता समारंभ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. तो आता ४ व ५ नोव्हेंबर रोजी होत आहे, शहरातील पाटीलमळा येथील यशोधन सृष्टी येथे हा सांगत सोहळा होणार आहे. या निमित्ताने राजापूर अर्बनने दोन दिवस राजापूरवासीयांसाठी निखळ आनंदाची मेजवानी दिली आहे. यामध्ये शनिवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या सांगता समारंभाचा शुभारंभ, मान्यवरांचा सत्कार, स्मरणिका प्रकाशन, अध्यक्ष व मान्यवरांची मनोगते, स्नेहभोजन, दुपारी राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, बँकिंग सल्लागार गणेश निमकर यांच्यासहित सहकार संवाद असा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवारी ५ नोव्हेंबर रोजी महिलांसाठी विशेष कार्यक्रम, स्थानिक महिलांसाठी सकाळी १० . ३० वाजता फुलांची आरस स्पर्धा, ज्वेलरी प्रशिक्षण व होममिनिस्टर कार्यक्रम रंगणार आहे. तर बँक कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमही होणार आहेत. दुपारी ३ वाजता श्रीदेव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ यांच्या पारंपारिक व आधुनिक फुगड्या, त्यानंतर संजय उपाध्ये यांचा बहारदार गप्पांचा कार्यक्रम व रात्री ९ वाजता करून गेलो गाव हे नाटक सादरीकरण होणार आहे. या नाटकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या भाऊ कदम व आंकार भोजने यांचा अभिनय पाहण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. राजापूरातील येळवण गावचे सुपुत्र असलेले राजेश देशपांडे हे या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक असून ते देखील यावेळी उपस्थित रहाणार आहेत.
शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी होणाऱ्या कार्यक्रमांला पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, आ. शेखर निकम, राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, बँकिंग सल्लागार गणेश निमकर, माजी अध्यक्ष रविंद्र ठाकूरदेसाई आदि प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार असल्याचे काझी व अभ्यंकर यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, संचालक संजय ओगले, राजेंद्र कुशे, प्रकाश कातकर, दिनानाथ कोळवणकर, सौ. प्रतिभा रेडीज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, ओएसडी प्रसन्न मालपेकर आदी उपस्थित होते. शतकोत्त्तर राजापूरचा छायाचित्रांतुन होणार उलगडा राजापुरातील प्रसिध्द छायाचित्रकार प्रदीप कोळेकर यांचे यावेळी दोन दिवस छायाचित्रांचे प्रदर्शन या सोहळयात पहाता येणार आहे. याप्रसंगी शतकोत्तर काळातील राजापूर कसे होते हे त्यांच्या छायाचित्रांच्या माध्यमातुन पहाता येणार आहे. राजापूर अर्बन बॅक, राजापूर हायस्कुल, राजापूर नगर वाचनालय, राजापूर वेदपाठशाळा यांसह अन्य छायाचित्रांतुन राजापूरच्या त्या काळातील इतिहास पहाता येणार आहे.