आपण आपल्या समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजातील दीनदुबळ्या, अडलेल्या, नडलेल्या सर्वसामान्याला मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा कार्यकर्ता हा संवाद समन्वयात ग्राहक कल्याण साधण्यासाठी प्रयत्नशिल असला पाहिजे असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी प्रतिपादन केले.
पुणे महानगर आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण व राज्य कार्यकारणी यांची विशेष सभा गुरुवार दि.३ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १० या वेळेत जिओमिट अॕपव्दारे आॕनलाईन पध्दतीने संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या नवोदित कार्यकर्त्यांना संस्थेची व संस्थेच्या कार्याची ओळख करुन देताना वाघमारे बोलत होते. सभेच्या सुरुवातीला ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद आणि भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांना अभिवादन करण्यात आले. आॕनलाईन सभेमध्ये सहभागी झालेल्या राज्य पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण विभागातील नवोदित कार्यकर्त्यांचे स्वागत करून सभेचा उद्देश सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील यांनी स्पष्ट केला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर समाजशरणवृत्तीने ग्राहक चळवळीचे पवित्र कार्य करीत आहे. आपल्या सभोवती घडणाऱ्या अन्यायकारक गोष्टी त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. पैशांच्या श्रीमंतीपेक्षा साधनेची श्रीमंती खूप मोठी असते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचा कार्यकर्ता हा संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून काम करणारा असावा असे वाघमारे यांनी सांगितले. कोरोना काळामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केलेल्या कार्याचा वाघमारे यांनी आढावा घेतला. वाढीव वीज बिल व बिल भरण्याबाबत केलेली सक्ती तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर संस्था गांभीर्याने विचार करीत असून प्रशासनाशी संवाद व पत्रव्यवहार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य चांगल्या प्रकारे सुरु असल्याबद्दल जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांचे अरुण वाघमारे यांनी कौतुक केले.
या ऑनलाईन सभेमध्ये श्री.सिताराम कुडतरकर-कणकवली, श्री.विष्णू दळवी-कुडाळ, श्री.प्रमोद कोणकर-रत्तागिरी, सौ.प्रणिता वैराळ-मुंबई, सौ.वैशाली रोगे-ठाणे, श्री.सुधीर नकाशे-वैभववाडी, सौ.वैदेही जुवाटकर-मालवण, सौ.परिणिता वर्तक-सावंतवाडी, श्री.अनंत नाईक-सावंतवाडी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.