*बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आणि साने गुरुजी कथामाला मालवण यांचे संयुक्त आयोजन*
मालवण :
साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे यांच्या संयुक्त विद्यमाने “कथामित्र मारुती आचरेकर कथानगरी आचरे नं. १” येथे रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी कथाकथन महोत्सव रंगणार आहे. संपूर्ण मालवण तालुक्यातून इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतचे निवडक ६४ बालकथाकार यात सहभागी होणार आहेत. वर्गस्तर, शाळास्तर, केंद्रस्तर स्पर्धा होऊन त्यातून ६४ जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. इयत्ता तिसरी – चौथीचे स्पर्धक ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर कथाकथन करणार आहेत तर इयत्ता पाचवी – सहावीचे स्पर्धक ‘गुरु शिष्य’ यांच्यावर कथा सांगणार आहेत तर सातवी – आठवीचे स्पर्धक ‘महिला वैज्ञानिकांच्या कथा’ कथन करणार आहेत. दोन्ही संस्थांच्या वतीने आकर्षक पारितोषिके, नेत्रदीपक स्मृतीचिन्हे, दर्जेदार प्रमाणपत्रे, निवडक ग्रंथ पुरस्कार आदी भव्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर महोत्सवाचा शुभारंभ २९ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी ठीक ९:३० वा. होणार आहे. शुभारंभ सोहळ्याचे अध्यक्ष मा. लक्ष्मणराव आचरेकर (चेअरमन, रामेश्वर वैभवशाली पतपेढी) हे भूषविणार आहेत तर उद्घाटक म्हणून मा. आनंदराव डिंगणकर (डेप्युटी झोनल मॅनेजर – गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी झो) हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मान्यवर म्हणून मा. कृष्णा संजय दिल्लेवार (व्यवसाय विकास अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र सिंधुदुर्ग) आणि मा. सिलंबु अरुमुगम (शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे) हे उपस्थित राहणार आहेत. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा त्याच दिवशी संध्याकाळी मा. सदानंद कांबळी, सल्लागार समिती सदस्य कथामाला मालवण यांचे अध्यक्षतेखाली आणि मा. प्रकाश किरात पेडणेकर, ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते वायंगणी भंडारवाडा यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांसाठी अल्पोपहार, दुपारचे मध्यान्ह भोजन देण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकाला ‘बालकुमारचा दिवाळी अंक’ भेट देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून सदर स्पर्धांना वाढता प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धा संयोजनाबद्दल सुरेश शा. ठाकूर म्हणाले, “मुलांची वाचनाची ओढ वाढावी, वक्तृत्व कलेत मुले निपुण व्हावीत आणि एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी म्हणून गेली पन्नास वर्षे मालवण तालुका कथामाला जवळजवळ १५ विविध उपक्रम राबवीत आहे. तालुकास्तर भव्य कथाकथन स्पर्धा हा त्यापैकी एक उपक्रम असून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आचरे आणि साने गुरुजी कथामाला मालवण यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. “संस्कारांची जपणूक आणि बचतीचे संस्कार” हे या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. तीन स्तरावर चालणारी एवढी भव्य बालकुमार कथाकथन स्पर्धा ही एकमेव आहे.”