You are currently viewing सोनुर्ली जत्रौत्सवाची सांगता तुलाभाराने

सोनुर्ली जत्रौत्सवाची सांगता तुलाभाराने

सावंतवाडी
दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाची बुधवारी दुसऱ्या दिवशी तुलाभाराच्या कार्यक्रमाने उत्साहात सांगता झाली. जत्रौत्सवाच्या रात्री नोंदणीकृत मोजक्याच महिला व पुरुष भाविकांकडून देवीच्या लोटांगणांचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेत हा सोहळा संपन्न झाला.

श्रीदेवी माऊलीचा जत्रौत्सव सिंधुदुर्गातील प्रमुख जत्रौत्सवांपैकी एक आहे. या वार्षिक उत्सवाला दरवर्षी हजारो भाविक दाखल होतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटीकडून हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. केवळ सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावातीलच लोकांना जत्रौत्सवामध्ये प्रवेश दिला होता. त्यामुळे दरवर्षी दिसणारी भाविक भक्तांची गर्दी या वर्षी झाली नसल्याने प्रथमच मंदिर परिसरामध्ये एक प्रकारे शुकशुकाट होता. रात्री साडेअकराच्या सुमारास देवीची पालखी कुळघराकडून सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे दाखल झाली.
त्यानंतर लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देवस्थान कमिटीकडे नोंद केलेल्या ठराविक महिला आणि पुरुष भाविकांकडून लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. प्रमुख मानकरी आणि ठराविक ग्रामस्थांना मंदिर परिसरामध्ये प्रवेश देताना इतर गावातील ग्रामस्थांना आणि भक्तांना लोटांगण कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. यावेळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
बुधवारी जत्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास तुलाभाराचा कार्यक्रम पार पडला. नवस केलेल्या भाविक भक्तांनी तुलाभार करत नवस फेड केला. यात तांदूळ, इतर धान्य, साखर, गूळ अशा वस्तूंनी तुला करण्यात आली.
दुसऱ्या दिवशीही भाविकांना सोशल डिस्टन्स राखत देवीचे दर्शन देण्यात आले. दुपारी देवीचा कौल घेतल्यानंतर जत्रौत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा