सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याची जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने क्रीडा क्षेत्रात आणखी एक भरारी घेतली असून गोवा येथे होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून तिची निवड झाली आहे.
सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथील पूर्वा गावडे ही राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे बालेवाडी येथे जलतरणचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यत तीने कमी वयात अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविले आहे. आता तिची मॉडर्न पेंटथलोन या प्रकरामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मॉडर्न पेंटथलोन या क्रीडा प्रकरामध्ये महाराष्ट्र राज्यातून खेळाडू पाठवण्यासाठी नाशिक येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये पूर्वा गावडे हिने १६०० मिटर रनिंग ,३०० मिटर स्विमिंग आणि पुन्हा १६०० मिटर रनिंग या पेंटथलोन क्रीडा प्रकारात उत्तम प्रदर्शन केले त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून तिची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शासना मार्फत घेतल्या जाणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत पूर्वांची खुल्या गटातून पहिल्यांदाच ही निवड झाली असून अकरावी मध्ये शिकत असलेल्या पूर्वाने कमी वयात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड होण्याची घेतलेली ही मोठी झेप कौतुकास्पद असुन सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.