You are currently viewing विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशला पराभूत करत विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशला पराभूत करत विश्वचषकात सलग चौथा विजय मिळवला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने सलग चौथा सामना जिंकला आहे. पुण्याच्या मैदानावर टीम इंडियाने बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४१.३ षटकात तीन विकेट गमावून २६१ धावा केल्या आणि सामना जिंकला. भारताकडून विराट कोहलीने नाबाद १०३ धावा केल्या. शुभमन गिलनेही ५३ धावांची शानदार खेळी केली. रोहित शर्माने ४८ धावा केल्या. गोलंदाजीत रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

 

बांगलादेशकडून लिटन दासने ६६ आणि तनजीद हसनने ५१ धावा केल्या. महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी केली. त्याचवेळी मेहदी हसनने गोलंदाजी करताना दोन बळी घेतले. या विजयासह २०११ पासूनच्या विश्वचषकात भारतीय संघाचा बांगलादेशवरचा दबदबा कायम राहिला. विश्वचषकात बांगलादेशवरचा हा सलग चौथा विजय आहे. २००७ मधील पराभव वगळता उर्वरित चार सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला आहे. २०११, २०१५, २०१९ आणि २०२३ विश्वचषकात या संघाविरुद्ध विजय मिळवला आहे.

 

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ६३ धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट ९३ धावांवर पडली. तंजिद ४३ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही ६६ धावा करून जडेजाचा बळी ठरला. पहिला विकेट ९३ धावांवर गमावलेल्या बांगलादेशची धावसंख्या १३७/४ अशी झाली. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. शार्दुलने १६ धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही ३८ धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने ३६ चेंडूत ४६ धावा करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर टाकले. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या २५६ धावांपर्यंत नेली. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल आणि कुलदीपला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

 

२५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने वेगवान सुरुवात केली. पॉवरप्लेमध्येच संघाची धावसंख्या ५० धावा पार झाली. रोहित आणि गिलने पहिल्या १० षटकात ६३ धावा जोडल्या. मात्र, षटकार मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा वैयक्तिक ४८ धावांवर बाद झाला. यानंतर कोहलीने आक्रमक सुरुवात केली आणि पहिल्या चार चेंडूत १३ धावा केल्या. त्याचवेळी गिलनेही आक्रमक पवित्रा घेतला. भारताची धावसंख्या १३ षटकात १०० धावा पार झाली होती. शुभमन गिलने ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारतीय संघाच्या धावगती कायम ठेवली. तो ५५ धावा करून बाद झाला. यावेळी भारताची धावसंख्या १३२ धावा होती. कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. दरम्यान, कोहलीनेही ४८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, मात्र १९ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर श्रेयस अय्यर खराब शॉट खेळून बाद झाला. तो मेहदी हसनचा दुसरा बळी ठरला.

 

हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर टीम इंडियाची फलंदाजी कमकुवत झाली होती आणि चौथी विकेट पडल्यावर जडेजाला फलंदाजीला यावे लागले. अशा स्थितीत राहुल आणि कोहलीने मोठ्या हुशारीने फलंदाजी केली. या दोघांनी मिळून भारताची धावसंख्या ३५ षटकांत २०० धावांच्या पुढे नेली. यानंतर फटके मुक्तपणे खेळले गेले. भारताला विजयासाठी २० धावांची गरज असताना कोहलीने धावणे थांबवले आणि शतकासाठी खेळायला सुरुवात केली. बांगलादेशी गोलंदाजांच्या सर्वोत्तम प्रयत्नांना न जुमानता कोहलीने भारताला षटकारासह विजय मिळवून दिला आणि आपले शतकही पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ४८ वे शतक आहे. कोहली १०३ आणि राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला.

 

या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पांड्या जखमी झाला. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पायाच्या स्नायूंना ताण आला. यामुळे त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने त्याच्या षटकाचे उर्वरित तीन चेंडू टाकले. हार्दिकच्या दुखापतीची तीव्रता कळू शकली नाही, मात्र तो रुग्णालयात गेला होता. सामन्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला की, त्याची दुखापत फारशी गंभीर नाही, तो लवकरात लवकर बरा होईल अशी आशा करू शकतो. मात्र, २२ ऑक्टोबरला होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिकसाठी खेळणे कठीण आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा