You are currently viewing हातपाटी वाळूबाबत लवकरच धोरण ठरवणार!

हातपाटी वाळूबाबत लवकरच धोरण ठरवणार!

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाला आश्वासन

हातपाटी वाळू उत्पादकांच्या प्रश्नावर सखोल चर्चा

प्रतिनिधी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड येथील हातपाटीची वाळू काढणारे सर्वसामान्य शेतकरी, मजूर हे संघटीत नाहीत. त्यामुळे शासनाकडून त्यांचा आवाज हा ऐकला जात नाही. मग प्रत्येक वर्षी अशा प्रकारच्या चर्चा होत राहतात. त्यात ड्रेजिंगवाल्याचे व अधिकारवाल्यांचे फावते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना या बाबतीत धोरणात्मक गोष्टी करण्याचे ठरवले आहे.

हातपाटी वाळू उत्पादकांचे दैन्य कधी संपणार, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हातपाटी वाळू उत्पादकांचा प्रश्न न चुकता दरवर्षी चर्चेला येतो. स्थानिक पातळीवरचे नेते, कार्यकर्ते वेगवेगळ्या कारणास्तव या प्रश्नामध्ये लक्ष घालून असतात. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये नुकतीच या बाबत विस्तृत चर्चा झाली बैठकीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. विजय भोसले हे उपस्थित राहिले होते. त्यावेळी आमदार हुस्नबानू खलिपे, अशोकराव जाधव, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, सिंधुदुर्गचे तालुका अध्यक्ष बाळा गावडे, महाविकास आघाडीतील कुडाळचे आमदार नाईक, चिपळूणचे आमदार शेखर निकम, खासदार विनायक राऊत उपस्थित होते.

हातपटीच्या वाळू उत्पादकांबाबत त्यांना करावे लागलेले शारीरिक कष्ट या बाबत महसूल मंत्री यांनी प्रथमच आपली संवेदना प्रकट केली. त्यांना जेवढी देता येईल तेवढी मदत शासनाकडून झाली पाहिजे, असे सांगितले. कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट धोरणाअभावी हातपाटी वाळूवाल्यांची फरपट होत. मग ते अगतीकतेतून जो दिसेल त्याच्यामागे जाण्याची मजबुरी वाढते. मुळातच हे मेहनतीचे काम असल्याने व रायगड ते सिंधुदुर्गपर्यंत साधारण 30 ते 35 हजार लोक या धंद्यामध्ये असल्यामुळे त्याच्याबाबतीत स्पष्ट धोरण असणे गरजेचे आहे. असे धोरण नसल्यामुळे दरवर्षी अनेक त्रास वाळूत चोरीने काढली जाते. त्याच्यावर पकडले गेल्यास 5 पटीचा दंड असतो. म्हणजेच काढलेल्या वाळूचे मूल्य हे शून्य ठरते. शासनाचा महसूल बूडतो फक्त काही अधिकाऱ्यांना ते सोईचे असते. म्हणून बहुतांशी ठिकाणी कानाडोळा केला जातो. काहींना उदाहरणादाखल पकडले जाते.

अगदी हातभट्टीच्या दारूसारखे काही ठिकाणी तर हातपाटीचे काही गट ड्रेजिंगवाल्यांना देवून हातपाटी कामगारांच्या पोटावर पाय आणला आहे. हातपाटीची वाळू ही दिवसाढवळया काढली जाते तर ड्रेजर अवैद्य पद्धतीने रात्रभरही लावला जातो. ड्रेजिंगच्या वाळूत प्रत्येक ब्रासला रू. 3000/ – अधिक जी.एस.टी. वगैरे अशी रॉयल्टी लावली जाते. परंतु हातपाटीच्या वाळूला साधारण रू. 1000/ – अधिक जी.एस.टी. वगैरे अशी रॉयल्टी आकारली जाते. ही आकारणी हातपाटीवाल्यावर पूर्ण अन्यायकारक आहे. सुदैवाने महसूल मंत्री यांना हा विषय पटलेला आहे आणि त्यांना स्पष्टपणे हातपाटी वाल्यांना रोयल्टी कमी लावण्यात येईल, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे रत्नागिरी जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले यांनी सांगितले.

हातपाटीवाले सक्शन पंप वापरत नाहीत: ॲड.भोसले
हातपाटीवाल्यांना चारशे रूपयांच्या वरती रॉयल्टी लावू नये, अशी विनंती प्रतिनिधी शिष्टमंडळांकडून महसूल मंत्री यांना करण्यात आली आहे. हातपाटीवाले सक्शन पंप लावून रेती काढतात. अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कथनकाला आम्ही विरोध करून सक्शन पंप हा विषयच हातपाटीच्या संदर्भात आणू नये, अशी विनती ॲड. विजय भोसले यांनी केली. याबद्दल महसूल मंत्री थोरात यांनी दिलेल्या निर्देशानुसार संबधित विभागाचे अधिकारी अडचणी न करता या बाबतीत योग्य सुस्पष्ट धोरण आखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा