*पत्रकार लेखिका मेघा कुलकर्णी लिखित शारदीय नवरात्रोत्सव निमित्त अप्रतिम लेख*
*सुगंध*
शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहेच. भारतीय संस्कृतीत भक्तिमय वातावरणाची परंपरा वर्षभर विविध सणांच्या माधमातून साकार होत असते. आदिशक्तीचा सन्मान आणि हा शक्तीपीठांचा उत्सव याची अलौकिकता विलोभनीय आहे. नवरात्रींचा सण भजन, कीर्तन, गीतांनी मंदिरांमंदिरातून भावभक्तीतून सजतो. प्रत्येक तीर्थक्षेत्री दिव्यांची रोषणाई, दीपमाळा उजळून सर्व परिसर तेजोमय होतो. श्रावण भाद्रपदातील ओलसर वातावरण आता कोरडे झालेले असते. उष्णहवा-गारवा यांचा लपंडाव सुरू असतो. घटस्थापना ते विजयादशमी हे नऊ दिवस वेगवेगळ्या प्रांतातील संस्कृतीची ओळख करून देतात. सर्व दैवतांना तेल अर्पण करणे दुर्गापूजा, महालक्ष्मी, अष्टभूजा या सगळ्या रूपांतील स्त्री देवतेची उपासना केली जाते. दक्षिणेत म्हैसूर दसऱ्याचे महत्व आहे तर बंगाल प्रांतात दुर्गापूजा.
निसर्गातील गंध देव्हाऱ्यांतील सुगंध बनतो, कारण घट स्थापला जातो, पूजन केला जातो. धान्यबीजाचे पिकांत रूपांतर होते ते अविरत तेवणाऱ्या निरांजनाच्या, समईच्या साक्षीने. काही कौटुंबिक प्रथेनुसार, घराण्याच्या रीतीरिवाजानुसार होम-हवन विशेष पूजा ही केल्या जातात. अगरबत्ती, धूपबत्ती, दीपमाळा, गाभाऱ्यातील अनेक दिव्यांचा महोत्सव मानवी मनांस शक्तीचा कारक होतो, कार्यउद्युक्तता निर्माण करतो. भक्तीच्या मेळाव्यात दुर्बुद्धीच्या विनाशाचा शेवट होतो, दुष्कृत्याचा संहार मात्र विजयादशमी करते. दैवतांच्या आशीर्वादाने तेजोवलय पाठीशी सदैव आहे याची सत्यता आत्मबळ देते. अंधकारातून उजळलेल्या आसमंताचे दृश्य, दूरवर मनांत, जीवनाच्या प्रवाहांत सोबत करते.
दहा दिवसांचा हा सण म्हणजे सृष्टीच्या चराचरांतील जिवंतपणा दिसून येतो. कोणतीही स्त्री एखाद्या घरी अनाहूतपणे आली तर तिच्या सौभाग्याचा सन्मान जसा नेहमीच केला जातो, तसाच तो या नवरात्रींमध्ये विशेषप्रथा म्हणून सांभाळला जातो. हळदीकुंकू, बांगड्या, फुलवेणी, खण-नारळाने भरली जाणारी ओटी या सगळ्यालाच एक प्रकारचे मानाचे स्थान आहे. पण सध्या एका वेगळ्याच विश्वांत काही लोक वावरत असतात. विरोधाभास निदर्शनासही आला, तो असा जोडीदारानंतर स्त्रियांना एकटेपणा वाटू नये म्हणून काही ठिकाणी रूढी-परंपरा झुगारून देऊन त्यांचा सन्मान केला जातो, समाजांत वावरण्याची संधी, वैधव्य हा अपराध नाही या भावनेतून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याची दूसरी बाजू म्हणजे एखादी सवाष्ण घरी आली तर महागड्या जीवनशैलीत एखाद्या घरांत ब्लाउजपीस नारळ उपलब्ध नसतो.
सन्मान कधीच मागून मिळत नाही तो समोरच्यांनी समजून-उमजून करायचा असतो. रिक्त हस्ते पाठवणी करणारीच्या घरांत काही नसते म्हणून ती अपेक्षा ठेवते असा भाग नाही. पुढच्या पिढीवर होणाऱ्या संस्कारांचा हाही एक महत्वाचा धागा असतो याचे भान घरांतील सदस्यांनी जपले पाहिजे. नवरात्रोत्सव म्हणजे आगळावेगळा उर्जास्त्रोत, सध्या तर दर दिवशीच्या वेगळ्या रंगांनुसार साड्या परिधान करण्याचा प्रघात सुरू आहे. यांमुळे महिला वर्गांत प्रचंड उत्साह दिसून येतो. कोजागिरीला [नवान्न पौर्णिमेस] पूर्ण चंद्राच्या शीतल छायेत मसाला दुधाचे सेवन केले जाते. जे एक प्रकारे भरभरून मिळणाऱ्या सुखसोयीचे प्रतिक आहे.
पूर्वजांची पुण्याई पदरी
जन्मांतरीचे सौभाग्य कोल्हापूरी
कन्या रूपांत पूजन गौरी
संस्कारातही सामर्थ्य देते करवीर नगरी
मेघनुश्री, लेखिका पत्रकार
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२
ईमेल – megha.kolatkar 21@gmail.com