– भाजपा कुडाळ मंडल चिटणीस राजेश पडते यांचा संजय पडतेंवर पलटवार
ज्या शिवसेनेवर मुख्यमंत्रीपदाची वर्षपूर्ती ही सुध्दा वर्षश्राद्धासारखी मनवण्याची पाळी आली आहे, त्या शिवसेनेने सिंधुदुर्गातुन तीन आमदार निवडून आणण्याचे स्वप्न पाहणे हा सर्वात मोठा विनोद आहे. कशाच्या जीवावर तीन आमदार जनतेने निवडून द्यावेत हे सुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी जाहीरपणे सांगावे, असे आव्हान भाजपा कुडाळ मंडल चिटणीस राजेश पडते यांनी दिले आहे.
शिवसेना सत्ताधारी पक्ष म्हणून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. लॉकडाऊनच्या काळात सिंधुदुर्गात स्वतःला कडीकुलुपात बंद करून घेणारे शिवसेना आमदार जनतेने अनुभवले आहेत. यथा राजा तथा प्रजा दुसरे काय? जनतेला स्वतःच्या मरणावर सोडून जाणाऱ्या शिवसेना आमदाराना पुन्हा निवडून द्यायला इथली जनता दुधखुळी नाही, हे संजय पडतेंनी जाणून घ्यावे. कोण सदस्य होणार असतील तर त्यांना नक्की करून घ्यावे, ती त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे, पण कार्यकर्त्यांना तीन आमदारवाल्या गुलबकावलीच्या गोष्टी सांगून मनोरंजन करणे त्यांनी थांबवावे.
कोकणवर आमचे प्रेम आहे म्हणणाऱ्या शिवसेनेने कधी नव्हे एवढे खंजीराचे वार कोकणी जनतेच्या पाठीत केले आहेत. लॉकडाऊनमध्ये यूपीबिहारच्या जनतेला खाऊपिऊ घालून कोंकणी जनतेला कोकणात येण्यापासुन कसे छळले होते, पासच्या नावावर कसे आर्थिक, शारिरीक व मानसिक हाल केले होते, हे जनता विसरलेली नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी पन्नास हजार देण्याची घोषणा करणारी शिवसेना दहा हजार देताना सुद्धा कशी “दमलेल्या बाबाची कहाणी” सांगू लागली हे सुद्धा कोकणी जनतेने पाहिले. कोकणातल्या काजू संशोधनाचा पैसा इतरत्र फिरवला गेला, तरी आवाज उठवण्याची हिंमत सेनेच्या आमदारांना झाली नाही. चांदा ते बांदा योजना गुंडाळून अपमान करत असतानाच, इथल्या सेना आमदारांवर सेनेचेच नेते विधानसभेत कसे हसत होते, ते आजही त्यांनी फुटेज काढून पहावे. जिल्हा नियोजनाचा प्रत्यक्ष विकास निधी दीडशे कोटीवरून एकवीस कोटींवर आणत सिंधुदुर्गच्या सेना नेत्यांची औकात अर्थमंत्र्यांनी दाखवली, तरीही हे थंड ते थंडच. आडाळीचा औषधी वनस्पती संशोधन केंद्र काँग्रेसचे मंत्री लातूरला नेण्याचा घाट घालत असताना अगतिक होऊन हातावर हात घेऊन बसणारे इथले आमदार जनतेने बघीतले आहेत. विकासाच्या गोष्टी जनता नुसती ऐकतेय, पण रस्त्यावरच्या जीवघेण्या खड्ड्यात रोजचा संघर्ष अनुभवतेय. वर्षभरातल्या अपयशाची गाथा वाचावी तेवढी थोडीच! एखादा नवीन प्रकल्प, एक इमारत पूर्ण झालेले महिला हॉस्पिटलसुद्धा ज्या आमदारांना सुरू करता येत नाही, त्यांच्याकडे बघून जनता तिसरा आमदार देईल, हे सांगणे संजय पडतेंना कसे जमत असावे हा मोठाच प्रश्न आहे. त्यांच्या “सिक्रेट ऑफ एनर्जीबद्दल” कौतुक आहे, पण त्या एनर्जीच्या भरात दिवास्वप्न पाहणाऱ्या संजय पडतेंना आम्ही आजच सांगतोय, की तिसरा सोडाच, पहिले दोन सुद्धा यापुढे विसरा. कोकणी जनता सहनशील आहे, सोशिक आहे, हालअपेष्टा सहन करेल, पण, “इथे विश्वासघाताला क्षमा नाही!”