You are currently viewing अर्चना घारे सावंतवाडी विधान सभेच्या उमेदवार – बाळासाहेब पाटील

अर्चना घारे सावंतवाडी विधान सभेच्या उमेदवार – बाळासाहेब पाटील

सावंतवाडी :

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सावंतवाडीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी स्वागत केले. पाटील यांनी भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली असता पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाशी भविष्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला नेत्या अर्चना घारे- परब, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर, भास्कर परब आदी उपस्थित होते.

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. भविष्यात शरद पवार गटाशी अजित पवार गट मिळणार आहे असा संभ्रम काहीजण निर्माण करत आहेत. परंतु अजित पवार गटाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळेच पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाच्या विरोधात धाव घेण्यात आली आहे असेही बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडी 2019 मध्ये सत्तेत आली. या काळात कोरोना आला. परंतु राज्यात उत्तर प्रदेश, गुजरात सारखी परिस्थिती होऊ दिली नाही. केंद्र सरकारचे निर्बंध राज्याने पाळले. परंतु जनतेला त्रास होईल असे कोणतेही कृत्य महाविकास आघाडीने केले नाही. इतर राज्यात मृत्यूचा खच पडत असताना राज्यात कोरोना काळात महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली असे पाटील म्हणाले. सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. कोणाचे कोणावर निर्बंध राहिलेले नाहीत. आता तर कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती होत आहे. सध्या अनेक पोलीस अधिकारी लाच खोरी मध्ये सापडत आहेत. सावंतवाडीत दोन पोलीस अधिकारी लाचखोरीत मिळाले आहेत. शासनाचे बंधन असताना हे अधिकारी लाच घेतात. मग कंत्राटी पोलिसांवर कुणाचे बंधन नसणार. त्यामुळे त्यांना मोकळे रान मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्यावर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आहे.

या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण लक्ष देणार आहे. दोन्ही जिल्ह्यात पक्षाला विधानसभा जागा सोडण्यात याव्या यासाठी प्रयत्न करण्यात येईल. भविष्यात इंडिया आघाडी होणार असल्यामुळे जागांची तडजोड होणार आहे. त्यामुळे आत्ताच कुठल्या जागा सुटणार हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु, ज्या जागा सुटणार आहेत त्या ठिकाणी आमची तयारी आहे. त्यासाठी सावंतवाडीहीतही आम्ही मेळावे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. त्यामुळे भाजपाला जनता कंटाळली आहे. भविष्यात केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यातही महाविकास आघाडी सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शाळा दत्तक देण्याच्या योजनेला पक्षाचा विरोधात राहणार असल्याचे पाटील म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षात कुठलीही फूट पडली नाही. अबीद नाईक अजित पवार गटात गेले असले तरी ते पक्षाच्या कुठल्याही बैठकीला हजर राहत नव्हते असे ते म्हणाले. अबीद नाईक यांच्या सारखे जे गेले ते कधी पक्षात न दिसणारे आणि रस्त्यावर भेटणारे होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काय फरक पडणार अशी टीका पाटील यांनी केली.

अर्चना घारेंच्या उमेदवारीबद्दल विचारले असता प्रदेशाध्यक्षांनी सांगितले म्हणजे “फायनल” असे सांगून सगळेच थेट बोलायचं नसतं असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा