मंडळाच्या अध्यक्षपदी संजय नाईक, उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर
बांदा:
कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे १५ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी संजय नाईक, उपाध्यक्षपदी आपा चिंदरकर, सचिवपदी प्रवीण शिरसाट तर खजिनदारपदी सलील वळंजू यांची निवड करण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त १५ ला सकाळी श्री देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना, सायंकाळी दत्त माऊली पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, दाभोली यांचा दशावतार नाट्यप्रयोग, १६ ला रात्री ९ वाजता ओंकार कलामंच, सावंतवाडी यांचा बहारदार कार्यक्रम, मंगळवार १७ ला नामांकित निमंत्रित गरबा आणि स्थानिक विवाहित महिलांचा गरबा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून सोलो डान्ससाठी अनुक्रमे ३३००, २२००, ११०० रुपये रोख पारितोषिक तसेच ग्रुप डान्ससाठी अनुक्रमे ५५००, ३३००, २२०० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
बुधवारी १८ ला सायंकाळी ४ वाजता पाककला स्पर्धा (घटक – नाचणी), रात्री ९ वाजता सूर संगम म्युझिकल करा ओके. गायन कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी १९ ला रात्री ९ वाजता निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडीलचे बुवा व्यंकटेश नर व विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, आजीवलीचे बुवा प्रवीण सुतार यांच्यात २०-२० डबलबारी भजनी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी २० ला सकाळी १० वाजता कुंकुमार्चन, शनिवारी २१ ला रात्री ९ वाजता १५ वर्षाखालील मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना अनुक्रमे ३३००, २२००, ११०० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
याच दिवशी विवाहित महिलांचा फॅशन शो व खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी २२ ला सायंकाळी ४ वाजता रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा, रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा रायझिंग स्टार म्युझिकल नाईट गोवा, सोमवार २३ ला रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा ओंकार मेलोडीज, गोवा हा संगीत रजनीचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार २४ ला दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजता भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवात दररोज सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम होणार आहेत. रसिक प्रेक्षकांनी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.