You are currently viewing कालाय तस्मै नमः

कालाय तस्मै नमः

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

कालाय तस्मै नमः

 

“उंबरठ्यावर माप ठेविले

मी पायाने उलटून आले

आले तुझिया घरी

कराया तुझीच रे चाकरी”

या आठवड्यातील उंबरठा हा विषय वाचला

आणि मला या फार जुन्या( १९५० च्या दशकातील असावे बहुदा) गाण्याची एकदम आठवण झाली. म्हणजे बघा ना उंबरठ्यावरचे माप ओलांडून मुलीने एकदा का घरात प्रवेश केला की त्या घराला सर्वस्व वाहणे हे तिचे आद्य कर्तव्य. उंबरठ्याच्या आतच तिचे सगळे विश्व जणू.

थोडक्यात उंबरठा म्हणजे मर्यादा. एका ठराविक मर्यादेच्या आत राहण्यासाठी विशेषतः स्त्रीने, हा उंबरठा असला पाहिजे.

तो काळच तसा होता. जुनी घरे किंवा वाडे पाहिले तर घरातील प्रत्येक खोलीला एक दगडी अथवा लाकडी उंबरठा असायचा. एकत्र कुटुंब पद्धती. घरातील थोरल्या बायकांचा आणि सुनांचा वावर स्वयंपाक घराच्या उंबरठ्यापर्यंत. मुले बाळे

माहेरवाशीणी मधल्या खोल्यातून खेळणार, अभ्यास करणार वगैरे… दुपारच्या वेळी स्त्रिया आतील भागातील जरा अंधाऱ्या खोलीत थोडी विश्रांती घेणार. घरातील कर्तेसवर्ते पुरुष तेवढे दिवाणखान्यातून आणि सर्वच खोल्यातून उठ बस करणार.

मुंबई पुण्यासारख्या शहरातून उंबरठ्याच्या या मर्यादांचे उल्लंघन ५०/६० वर्षांपूर्वी झाले असले तरी गावागावातून या मर्यादा

हटल्या नव्हत्या.

मी स्वतः अनुभवलेला आणि अगदी नात्यामधील माणसांच्या घरात घडलेला हा किस्सा आहे. माझ्या मावस बहिणीचे सासर कोल्हापूरचे. १९८०/८१ साल असावे,माझे पती, मी आणि आमची दोन मुले कोल्हापुरास गेलो होतो. बहीण तिथे राहत नसली तरी तिच्या सासूबाई, दीर व जाऊ तिथे असल्यामुळे त्याना भेटावयास जाणे

आम्हाला जरुरीचे वाटले. कोल्हापूरला त्यांचे स्वतःचे घर, चांगले ऐसपैस. सासुबाईंनी आमचे अगत्यही चांगले केले. त्या आणि बहिणीचे दीर बाहेरच्या हॉलमध्ये आमच्याशी गप्पागोष्टी करीत बसले, परंतु तिच्या जाऊ बाई मात्र बाहेर सासू आणि नवऱ्यासोबत बसल्या नाहीत. त्या आतल्या खोलीतूनच उंबरठ्याच्या आत उभ्या राहून

आमच्याशी संवाद साधत होत्या. मुंबईत राहणाऱ्या मला ही गोष्ट अतिशय खटकली. मी तिला अनेक वेळा, ” अगं मंगल ये ना बाहेर बैस” असे सांगत होते, परंतु ती आली नाही आणि तिच्या सासूबाईंनी सुद्धा तिला येण्यास सांगितले नाही.

तर असा हा उंबरठा! मर्यादा घालून देणारा….

प्रत्येक गोष्टीला मर्यादा हवीच. फुगा किती फुगवावा याला सीमा हवी. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडल्यावर काय झाले हे आपण सर्व जाणतोच. पण मर्यादेला ही मर्यादा हवी नाही का?

” एकदा का बायकांनी घराचा उंबरठा ओलांडला की त्यांच्यावर आपली कसलीच सत्ता राहत नाही” हे वाक्य मी अनेकदा ऐकले आहे. आता एकविसाव्या शतकात मात्र काळ पूर्ण बदलला आहे. हल्लीच्या सेल्फ कंटेंड फ्लॅटच्या खोल्यांना उंबरठेच नसतात. आजच्या पिढीला उंबरठा म्हणजे नक्की काय हे माहितही नसेल.

मी मधल्या पिढीतील म्हणजे आपण सगळेच बहुदा. आमच्या घरात उंबरठे होते, पण आमच्या वाट्याला उंबरठ्याच्या कडक मर्यादा कधीच आल्या नाहीत. हो पण घराच्या बाहेर किती राहायचे, कोणाशी किती जवळीक करायची या मर्यादा आम्ही अवश्य पाळल्या.

आज उंबरठे समूळ नष्ट झाले आहेत.

शिक्षण करियर सांभाळताना आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना ही बंधने कशी पाळणार? एक मात्र खरे की आजची पिढी फारच हुशार व तीक्ष्ण बुद्धीची आहे. मर्यादा तोडूनही मर्यादेत कसे राहायचे हे त्यांना बरोबर समजते. माझ्या दोन नाती डॉक्टर आहेत.

हॉस्पिटलमध्ये केव्हाही इमर्जन्सी आली

तर त्यांना रात्री बेरात्री जावेच लागते. सांभाळून कसे राहायचे हे त्या पुरेपूर जाणतात.

सत्य हेच म्हणावे लागेल की कालाय तस्मै नमः!

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा