मालवण :
मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश” या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 06/10/2023 रोजी जिल्हास्तरावरील आयोजित अमृत कलश यात्रेसाठी जिल्हातील सर्व नगरपालिकांनी जास्तीत जास्त कर्मचा-यासह आपला सहभाग नोंदवून हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी पार पाडणेबाबत प्राप्त निर्देशानुसार शुक्रवार दिनांक 06/10/2023 रोजी मालवण शहरातील विविध प्रभागांतील नागरीकांच्या उपस्थितीत संकलित केलेल्या मातीचा “अमृत कलश” घेऊन प्रशासक तथा मुख्य अधिकारी यांच्या समवेत मालवण नगरपरिषद कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रेसाठी जिल्हयातील इतर सर्व नगरपरिषदांसह उपस्थित होते. या दिवशी शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा सुरुळीत सुरु ठेवून नागरीकांसाठी नगरपरिषदेतील सर्व विभागातील कामे सुरु राहावीत या करीता आवश्यक कर्मचारी वर्ग नगरपरिषदेत उपस्थित ठेवण्यात आलेला होता.
असे असतांनाही राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी नगरपरिषदेत येऊन सर्व विभागांमध्ये फिरुन मुठभर वार्ताहारांना बोलावून नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित नसल्याचे भासवून नगरपरिषद प्रशासक, नगरपरिषद कर्मचारी आणि नगरपरिषदेसारख्या स्वायत्त संस्थेची नाहक बदनामी केलेली आहे.सदरची बाब अंधारी यांनी केवळ नगरपरिषदेवरील आकसापोटी व वैयक्तीक कामासाठी नगरपरिषदेत येऊन केलेली कृती असून इतर कोणत्याही नागरीकाची गैरसोय झाल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे बाळू अंधारी यांच्याविरुध्द मालवण नगरपरिषद आणि नगरपरिषद कर्मचारी यांची जनमानसात बदनामी व प्रतिमा मलिन केल्याबद्दल योग्य ती कडक कारवाई करावी या मागणीसाठी मालवण नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज सोमवार दिनांक 09/10/2023 रोजी नगरपरिषद प्रवेशद्वारावर एकत्रित येत ‘निषेध आंदोलन’ केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी “कामगार एकजुटीचा विजय असो”, “शहीदांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे”, “नगरपरिषदेची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे” अशा घोषणा दिल्या.
तसेच महेश अंधारी यांनी दिलेल्या एकतर्फी व तथ्यहिन बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या दैनिक रत्नागरी टाईम, दैनिक पुढारी व कोकण मिरर, ब्रेकिंग मालवणी, सिंधुदुर्ग 24 तास या प्रिंट (सोशल) मिडीयाच्या वार्ताहर यांनी प्रसिध्द करुन नगरपरिषदेची बदनामी होईल असे कृत्य सबंधित अॅडमीन व केल्यामुळे वार्ताहरांवर योग्य ती कारवाई करावी;अशीही आग्रही मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी मुख्य अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत विरांना वंदन उपक्रमासाठी आयोजित जिल्हयास्तरीय अमृत कलश यात्रेमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक भारतीयासाठी व कर्मचा-यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. अशा सच्चा देशप्रेमाने प्रेरित होऊन या यात्रेमध्ये मालवण नगरपरिषद प्रशासक व कर्मचारी सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य व सेवा बजावत असतांना अशा प्रकारच्या विघातक देशद्रोही कृत्यांमुळे कर्मचा-यांचे मानसिक खच्चीकरण काही समाज कंटकांकडून केलेले आहे. त्यामुळे समाजातील अशा आजारी व दुर्बल मनोवृत्तीला वेळीच आळा घालण्यासाठी बाळू अंधारी यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी तसेच मालवण नगरपरिषद विरुध्द तथ्यहीन बातमी प्रसिध्द करणा-या वृत्तपत्र व सोशल मिडीया यांच्या विरुध्द देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 पासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल असेही कर्माचा-यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
निषेध आंदोलन स्थळी श्री. संतोष जिरगे ,मुख्यअधिकारी तथा प्रशासक मालवण नगरपरिषद यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन कर्मचा-यांच्या भावना व भूमिका योग्य असल्याने आपले समर्थन दर्शवून सबंधितांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यक ती तक्रार पोलीस विभागाकडे दाखल करण्यात येईल आणि सबंधित वार्ताहर / पत्रकार यांचेबाबत सबंधित संपादक आणि प्रेस कौंसिल ऑफ इंडिया यांच्याकडे देखील आवश्यक तक्रार करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर नगरपरिषद वकिलांमार्फतही सबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरीता कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून सदर घटनेचा निषेध करून कार्यालयीन कामकाजात सहभाग घ्यावा अशी विनंती केली. मुख्य अधिकारी यांच्या विनंतीनुसार नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरीता कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित करून तात्काळ कार्यालयीन कामकाज सुरु केले.