इचलकरंजी / प्रतिनिधी :
येथील दि सोशल क्रेडिट सोसायटीच्या वतीने आपत्ती काळात देवदूताची भूमिका बजावत अनेकांना जीवदान देणा-या इचलकरंजी जीवनमुक्त सेवा संस्थेला १ लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते व संस्थेचे आधारस्तंभ राज बारगीर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल घोडके यांनी स्विकारला.
येथील महेश क्लबच्या सभागृहात नुकताच पार पडलेल्या दि सोशल सोसायटीच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.
इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात गरजूंना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल करुन उपचार करणे यासह विविध मदत केली जाते.या सेवाभावी कार्यामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच दि सोशल सोसायटीच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते व संस्थेचे आधारस्तंभ राज बारगीर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल घोडके यांना १ लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सोशल सोसायटीचे सलग २२ वर्षे चेअरमनपद भूषविलेले मिरासो समडोळे, संस्थापक संचालक, माजी चेअरमन रहमान खलिफा यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपत्कालीन काळात इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेचे मदतीचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे सांगितले.तसेच या कार्यास सर्व सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी विविध स्वरुपात मदतीचा हात देऊन या सामाजिक कार्याला आणखी बळ द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी दि सोशल सोसायटीचे आधारस्तंभ राज बारगीर यांनी इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्था ही नैसर्गिक आपत्तीच्या काळात देवदूतासारखी सर्वांना मदतीचा हात देण्याचे कार्य करत आहे.अनेकांना जीवदान देणारे हे मानवसेवेचे पवित्र कार्य असेच अविरतपणे सुरु रहावे, यासाठी आम्ही त्यांना नेहमीच सहकार्य करु, अशी ग्वाही दिली.
यावेळी इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके यांनी इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वांना रुग्णवाहिका, व्हीलचेअर व अन्य सुविधा पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.भविष्यात आयसीयू सुविधायुक्त रुग्णवाहिका सुरु करण्याचा संस्थेचा मानस असून यासाठी सर्वांनी आर्थिक व विविध स्वरुपात मदतीचा हात देऊन या कार्यास पाठबळ द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी दि सोशल सोसायटीचे चेअरमन मुबारक खलिफा, व्हा चेअरमन उमरफारुक लाटकर यांच्यासह सर्व संचालक, प्रकाश केस्ती, अब्दुलवाहिद काझी, इचलकरंजी जीवनमुक्ती सेवा संस्थेचे ताजुद्दीन दर्गा, विशाल तमायचे, शकुंतला परीट यांच्यासह सर्व सभासद व कर्मचारी उपस्थित होते.