नारीशक्ती विधेयकाने महिलांना प्रगतीचा मार्ग मिळाला – केंद्रीयमंत्री नारायण राणे
भाजपचा महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न
ओरोस
नारीशक्ती वंदन विधेयक आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना प्रगतीचा मार्ग आणि दिशा मोदी दिली आहे. भारत महासत्ता बनू पाहत आहे. आर्थिक व्यवस्थेत २०३० मध्ये तिसऱ्या स्थानी आणून देश महासत्ता करायचा आहे. यात महिलांचे योगदान महत्त्वाचे राहणार आहे. केवळ लोकसभा आणि विधानसभा सदस्य यापुरते हे विधेयक मर्यादित नसून महिला उद्योगपती बनाव्यात. त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान राहावे, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हे विधेयक आणले आहे. त्यामुळे महिलांची जबाबदारी वाढली आहे, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील भाजप महिला विभागाच्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे हा मेळावा हजारोंनी महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सौ नीलम राणे, आ नितेश राणे, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, संध्या तेरसे, महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरोज परब, डॉ प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.