*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.शैलजा करोडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*परतीचा पाऊस अन मी*
———————————
ढोल ताशा वाजवीत चालला चालला
परतीचा पाऊस निघून चालला
शेती माती भिजविली
विहीरी तळी ही भरली
मनाची मनाची कळी ती खुलली
शेतशिवार डोलले , बळीराजा आनंदला
ढोल ताशासंगे परतीचा पाऊस चालला
पाना फुलात खेळला
ओढे निर्झरातून गायिला
वीजेसवे गडगडाटी हासला
ऊन पावसात इंद्रधनुष्यी शोभला
ढोल ताशासंगे परतीचा पाऊस चालला
दही हंडीत रमला
मोरया जल्लोषात नाचला
नवरात्रीच्या दांडीया खेळला
सर्वत्र हिरवाई खुलवूनी चालला
ढोल ताशासंगे परतीचा पाऊस चालला
माझिया मनात गारवा फुलविला
सृष्टी मनोरमे शब्दात झुलला
लेखणीतून माझ्या प्रवाही झरझरला
पुन्हा नव्याने येण्याचा विश्वास दिधला
ढोल ताशासंगे परतीचा पाऊस चालला
——————————————————
डाॅ. शैलजा करोडे ©®
नेरुळ नवी मुंबई
मो.9764808391