राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
कणकवली प्रातिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पिळणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. पक्षप्रवेशानंतर अनंत पिळणकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत असल्याचे नियुक्तिपत्र सामंत यांच्या हस्ते पिळणकर यांना देण्यात आले.
यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर, किसान सेल अध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा संघटक डॉ.अभिनंदन मालंडकर, सुंदर पारकर, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, कुडाळ तालुकाध्यक्ष भास्कर परब, वैभववाडी टालुकाध्यक्ष रवी चव्हाण, व्यापार आघाडी अध्यक्ष पुंडलिक दळवी, रुपेश जाधव, महिला पदाधिकारी चित्रा देसाई, आशिष कदम, प्रथमेश चोडणकर, सागर वारंग आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेच्या मनात घर केलेला पक्ष आहे. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर कोकणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेली विकासकामे अद्वितीय आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुनरउभारणी चे काम जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांची भेट घेऊन करणार आहे. कणकवली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा खचाखच भरलेल्या मातोश्री मंगल कार्यालयात मेळावा घेतल्यानंतरच पत्रकार परिषद घेणार आहे. आधी करून दाखवेन नंतर बोलेन अशी आपल्या कामाच्या पद्धतीची चुणूक सामंत यांनी बोलून दाखवली. राज्यात महाघाडीची सत्ता असली तरी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जिल्ह्यात कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास शिवसेनेविरोधात रस्त्यावर उतरणार असा इशारा सामंत यांनी दिला. धरण प्रकल्पग्रस्तांच्या नवीन कुर्ली वसाहतीची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हावी यासाठी मंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करणार.
यापूढे अनंत पिळणकर यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही सामंत यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर बोलताना अनंत पिळणक यांनी आपली भूमिका मांडली. देवघर धरण बांधून ३० वर्षे होऊनही नवीन कुर्ली वसाहत साठी नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली नाहीय. धरण प्रकल्पग्रस्तांना सेवासुविधा मिळण्यासाठी स्वतःची हक्काची ग्रामपंचायत मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मंत्रालयीन पातळीवर यासाठी पाठपुरावा करून ग्रामपंचायत मंजूर करून देण्याचा शब्द दिला आहे. माझ्या गाववासीयांसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे पिळणकर यांनी सांगितले.
यावेळी अभिजित रावराणे, अशोक पवार, अरुण चव्हाण, सेनापती सावंत, संतोष तेली, जयेश परब यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.