You are currently viewing कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्रचे आयोजन 

कन्या महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्रचे आयोजन 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी,आणि आयक्यूएसी या विभागांच्या वतीने एक दिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व्या शतकातील मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ या मुख्य विषयाच्या अनुषंगाने हे राष्ट्रीय चर्चासत्र शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी महाविद्यालयाच्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे सभागृहात सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव सौ. शुभांगी गावडे यांच्या हस्ते होणार असून बीजभाषक म्हणून गोवा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सोमनाथ कोमरपंत हे असणार आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. श्रुती जोशी या मार्गदर्शन करणार आहेत तर दुसऱ्या सत्रात बार्शीच्या झाडबुके महाविद्यालयाचे प्रा. डॉ.गिरीश काशीद हे मार्गदर्शन करणार आहेत. भारतातील विविध राज्यांतून जवळ जवळ १४५ शोधनिबंध या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्राप्त झाले आहेत. हे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, शिवाजी विद्यापीठ इंग्रजी शिक्षक संघ, शिवाजी विद्यापीठ हिंदी शिक्षक संघ, रोटरी क्लब ऑफ अतिग्रे, इनरव्हिल क्लब ऑफ इचलकरंजी, बँक ऑफ महाराष्ट्र (इचलकरंजी शाखा) आणि मैत्री फाउंडेशन, इचलकरंजी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्रात मराठी, हिंदी व इंग्रजी या विषयांमधील तज्ञ साधन व्यक्ती मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील साहित्यिक, समीक्षक, संशोधक उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक बंधू भगिनी यांनी या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम आणि या राष्ट्रीय चर्चासत्राचे मुख्य समन्वयक प्रा.डॉ. सुभाष जाधव, आयक्यूएसी समन्वयक सुधाकर इंडी, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल नाईक, इंग्रजी विभाग प्रमुख दिपक सरनोबत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा